नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने २ कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. यातच आता भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही कोरोनावरून केंद्राला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या कोरोना संकट काळात काहीच कामाचे नसून सध्याची कोरोनाची परिस्थिती हातळ्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. (Modi should therefore delegate the conduct of this war to Gadkari. Relying on PMO is useless - Subramanian Swamy)
यासंदर्भात सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले आहे. "ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण कोरोना महामारीचा सामना करुन नक्कीच टिकू. आता आपण योग्य काळजी घेतली नाही, तर मुलांवर परिणाम करणारी आणखी एक लाट आपल्याकडे येईल. त्यामुळे मोदींनी या कोरोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे उपयोगाचे ठरणार नाही," असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
याचबरोबर, सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याबद्दलही भाष्य केले आहे. डॉ. हर्ष वर्धन हे खूपच नम्र असून त्यांना त्यांच्या खात्याचे काम मोकळेपणाने करु दिले जात नसल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. "नाही, हर्ष वर्धन यांना मोकळेपणे काम करु दिले जात नाही. परंतू अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल," अशी अपेक्षा सुब्रमण्यम स्वामी स्वामी यांनी ट्विटद्वारे केली आहे. दरम्यान, नितीन गडकरीच का? असा प्रश्न एकाने विचारला असता सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, "कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे".
२ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्गभारत हा जगातील दुसरा देश आहे, जिथे २ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना संसर्ग वाढीचा वेग इतका आहे की, अवघ्या १७ दिवसांत रुग्णांची संख्या १ कोटींवरून २ कोटींवर गेली आहे. गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे ३ लाख ५७ हजार २२९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासात कोरोनामुळे ३ हजार ४४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ३ लाख २० हजार २८९ जण कोरोनापासून बरे झाले आहेत.
मृतांच्या आकडेवारीत भारताने मेक्सिकोला मागे टाकलेकोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये भारत मेक्सिकोला मागे टाकून तिसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. आतापर्यंत २ लाख १८ हजार ९४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत ५.९२ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ब्राझीलमध्ये ४.०७ लाख लोकांचा मृत्यू आहे. आतापर्यंत मेक्सिकोमध्ये २.१७ लाख मृत्यूची नोंद झाली असून हा चौथ्या क्रमांकावर आहे.