सिद्धार्थनगर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री अखिलेश यादव व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकमेकांवर आरोप व शाब्दिक हल्ले सुरूच आहेत. येथे शनिवारी झालेल्या निवडणूक प्रचार सभेत अखिलेश यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधानांच्या फतेहपूर येथील विधानांचा समाचार घेताना अखिलेश म्हणाले की, ते (मोदी) कब्रस्तान आणि स्मशानाची भाषा करीत आहेत. आम्ही मात्र लॅपटॉप आणि स्मार्टफोन जनतेला देण्याचे बोलत आहोत.राज्य सरकार एका समुदायाला खुश ठेवण्यासाठी दुसऱ्या समाजाबाबत भेदभावाची भूमिका घेत असल्याचा आरोप मोदींनी फतेहपूर येथील सभेत केला होता. एखाद्या गावात कब्रस्तान तयार केले जाणार असेल, तर तेथे स्मशानभूमीही तयार केली पाहिजे. जर रमजानमध्ये वीज मिळत असेल, तर दिवाळीतही ती मिळायला हवी. जर होळीला वीज मिळत असेल, तर ती ईदच्या दिवशीही मिळाली पाहिजे. भेदभाव व्हायला नको, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. मोदींनी शुक्रवारी दिलेल्या भाषणावर टीका करताना अखिलेश म्हणाले की, मोदीजींनी काल तीन पानांचे भाषण दिले; पण ते एक तरी गोष्ट शेतकरी आणि गरिबांबाबत बोलल्याचे दाखवून द्या. गोंडा येथील निवडणूक सभेला संबोधित करताना मोदींनी सपावर जोरदार टीका केली होती. सपा माफियांना पाठीशी घालत असून, त्यामुळे युवकांचे भवितव्य उद्ध्वस्त होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना अखिलेश म्हणाले की, आपल्या बालपणी प्रत्येकाने थोडाफार खोटारडेपणा केलेला असतो. मोदी परीक्षेतील नकलांचा मुद्दा उपस्थित करीत आहेत; पण भाजपने आमच्या जाहीरनाम्याची नक्कल केली त्याचे काय, असा सवाल त्यांनी केला. समाजवादी पार्टी काँग्रेससोबत युती करून उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवीत आहे. मतदानाचे चार टप्पे झाले असून, पूर्व आणि मध्य भागात आणखी तीन टप्प्यांचे मतदान होणार असून, पाचव्या टप्प्याचे मतदान सोमवारी होणार आहे, तर ११ मार्च रोजी मतमोजणी होेईल. (वृत्तसंस्था)बसपापासून सावध राहाबसपाप्रमुख मायावती निवडणुकीनंतर कधीही भाजपशी युती करू शकतात, असे सांगून अखिलेश यादव यांनी बसपापासून सावध राहा, असा सल्ला जनतेला दिला. यापूर्वीही अनेक प्रचारसभांत अखिलेश यांनी मायावतींना संधीसाधू म्हटले होते. वेळ आल्यानंतर त्या भाजपशी हातमिळवणी करू शकतात. यापूर्वीही मायावतींनी भाजपच्या नेत्यांना राखी बांधली असून, पुढेही त्या असे करू शकतात, असे त्यांनी बोलून दाखविले.
मोदी स्मशानाचे बोलतात, आम्ही लॅपटॉपचे बोलतो!
By admin | Published: February 25, 2017 11:45 PM