ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - एमआयएम अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करत ट्रिपल तलाकच्या मुद्याचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रिपल तलाक आणि राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करुन मतदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं असदुद्दीन ओवेसी बोलले आहेत.
'एकूण 7 कोटी 36 लाख मुस्लिम विवाहित असून त्यांनी घटस्फोट घेतला किंवा दिलेला नाही. केवळ एक टक्के मुस्लिमांनी तलाक दिला आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी याचा राजकीय मुद्दा म्हणून वापर करत आहेत', असं असदुद्दीन ओवेसी बोलले आहेत. चांगलं सरकार आणि भ्रष्टाचाराकडे लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान मोदी ट्रिपल तलाकला निवडणुकीतील मुख्य मुद्दा बनवत असल्याचा आरोपही ओवेसी यांनी केला आहे.
यावेळी बोलताना ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही हल्ला चढवला. देशाला सर्वांच्या प्रयत्नामुळे स्वातंत्र्य मिळालं, फक्त संघ परिवारामुळे नाही असं ओवेसी बोलले आहेत. तसंच इशरत जहाँला न्याय देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. 'ए दिल है मुश्किल' चित्रपटाच्या रिलीजसाठी राज ठाकरेंसोबत चर्चा करुन मध्यस्थी केल्याप्रकरणीही ओवेसी यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.