नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जगातील सर्वच देश प्रयत्न करत आहेत. भारतात देखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. लोकांना घऱातून बाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. मात्र काही राजकीय नेत्यांकडून कोरोना व्हायरसच्या आपत्तीत देखील राजकारण करण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने मुस्लिमांना अजानसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
पश्चिम बंगालमधील या टीएमसी नेत्याचे नाव अख्तर हुसैन आहे. देशात लॉकडाउन असताना देखील लोकांना आवाहन केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळी वाजवून कोरोनाला रोखू शकतात तर मग कोरोनाला मात देण्यासाठी आपण प्रार्थना का करू नये, असा अजब सवाल केला. पंतप्रधान मोदींनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तसेच सायंकाळी पाच वाजता आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांचे आभार मानण्यासाठी लोकांना पाच मिनिटं टाळ्या, थाळी किंवा घंटी वाजविण्याचे आवाहन केले होते.
या संदर्भात हुसैन यांना माध्यमातून प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, कोरोना व्हायरसवर आतापर्यंत लस निघाली का ? कोरोनाला अजानने रोखता येऊ शकते. लोक काही ना काही कारण काढून रस्त्यावर फिरत आहेत. मग अजानसाठी एकत्र आले तर काय बिघडतं असा उलट प्रश्न हुसैन यांनी केला.
लॉकडाउनमुळे सामूहिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशातील तमाम मुस्लिम संघटनांनी देखील कोरोना व्हायरसचे संकट पाहता, मशिदीत नमाजसाठी एकत्र न येण्याचे आवाहन केले आहे.