ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - दिल्ली विधानसभेत सत्तास्थापनेसाठी भाजप व आम आदमी पक्षात रस्सीखेच सुरु असला तरी २ ऑक्टोंबरपासून सुरु होणा-या स्वच्छता अभियानासाठी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मोदींना पाठिंबा दर्शवला आहे. मात्र स्वच्छतेच्या नावाखाली सुरु असलेला भ्रष्टाचार संपवल्याशिवाय भारत स्वच्छ होणार नाही असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने सर्व राजकीय पक्षांना २ ऑक्टोंबररोजी महात्मा गांधीजींच्या जयंत्तीनिमित्त सुरु होणा-या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला आपने पाठिंबा दर्शवला असून अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवून पाठिंबा दर्शवला. यात केजरीवाल म्हणतात, प्रत्येक भारतीयाला स्वच्छ भारत हवा आहे. आम्ही २ ऑक्टोंबरनंतरही दिल्लीत स्वच्छता मोहीम सुरुच ठेवू. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः वाल्मिकी सदन येथे हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीमेत सहभागी होतील ही बाबही कौतुकास्पद असून यामुळे सर्वसामान्यांना प्रेरणाही मिळेल असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
या अभियानाचे कौतुक करतानाच केजरीवाल यांनी स्वच्छता अभियानासाठी केंद्र सरकारला काही सुचनाही केल्या आहेत. सफाई कामगारांना न्याय मिळवून देणे, साफसफाईसाठी यंत्रांचा वापर, केवळ एक दिवस मोहीम न राबवता ती दररोज सुरु राबवावी अशा सूचनाही त्यांनी नायडूंना पाठवलेल्या पत्रात केल्या आहेत.