कांग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांचे एक विधान आता त्यांच्याच आंगलट आले आहे. 2019 मध्ये कर्नाटकातील एका निवडणूक प्रचार सभेत भाषण करताना राहुल यांनी, 'सर्व चोरांचे आडनाव मोदीच कसे असते?' असा प्रश्न विचारला होता. आता या प्रकरणात गुरुवारी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मात्र त्यांना लगेचच जामीनही मिळाला आहे. त्यांच्याविरोधात गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती. तर जाणून घेऊयात कोण आहेत पूर्णेश मोदी?
पूर्णेश मोदी हे सूरतमधील अदजान भागात राहतात. ते गुजरातच्या तेराव्या विधानसभा (2013-17) पोट निवडणुकीत विजय मिळवून पहिल्यांदाच सभागृहात पोहोचले होते. खरे तर, 2013 मध्ये तेथील तत्कालीन आमदार किशोर भाई यांचे आजारपणामुळे निधन झाले होते. यानंतर तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने पूर्णेश मोदी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते.
यानंतर 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळीही पूर्णेश मोदी हेच भाजपचे उमेदवार होते. यावेळीही त्यांचा विजय झाला होता. या निवडमुकीत त्यांना 1 लाख 11 हजार 615 मते मिळाली होती. तर काँग्रेस उमेदवार इकबाल दाऊद पटेल यांना 33 हजार 733 मते मिळाली होती. पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा प्रामुख्याने सूरत मधील नागरिकांच्या प्रभावाखाली असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.
पूर्णेश मोदी सभागृहात गुजरात सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीचे सदस्य होते, 12 ऑगस्ट 2016 ते 25 डिसेंबर 2017 पर्यंत संसदीय सचिव होते. यापूर्वी ते, सूरत महानगर पालिकेत नगरसेवक होते. 2000-05 या काळात ते महानगरपालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेते होते. याशिवाय ते 2009-12 आणि 2013-16 दरम्यान सूरतनगर भाजपचे अध्यक्ष देखील होते.
राहुल गांधींच्या कर्नाटकातील वक्तव्यासंदर्भात प्रकरण सूरत सेशन कोर्टात सुरू होते. राहुल यांचे वक्तव्य म्हणजे, संपूर्ण मोदी समाजाचा अपमान असल्याचे म्हणत, भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.