Rahul Gandhi: गुजरात उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीशी संबंधित गुन्हेगारी बदनामी प्रकरणात दोषी ठरविल्याबद्दल अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आणि उन्हाळी सुटीनंतर अंतिम आदेश दिला जाईल, असे सांगितले. मात्र, याच प्रकरणी आता रांचीतील एका न्यायालयाने राहुल गांधी यांची एक याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांना न्यायालयासमोर उपस्थित राहावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप मोदी नामक व्यक्तीने ‘मोदी आडनाव’ टिप्पणीवरून रांचीतील एका न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी यांच्यावतीने प्रदीप चंद्रा युक्तिवाद करत आहेत. या न्यायालयातील सुनावणीसाठी वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यावरून सूट मिळावी, अशी विनंती राहुल गांधी यांच्यावतीने न्यायालयाला करण्यात आली. मात्र, सूट मिळण्यासंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे राहुल गांधी यांना आता न्यायालयासमोर उपस्थित राहावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, गुजरात उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी राहुल गांधी यांची बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात तातडीचा म्हणून अंतरिम किंवा अंतिम आदेश देण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक म्हणाले की, या टप्प्यावर अंतरिम संरक्षण दिले जाऊ शकत नाही. सर्व तपशील आणि कार्यवाहीचा अधिकृत अहवाल पाहिल्यानंतरच उन्हाळी सुटीनंतर अंतिम आदेश देऊ.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"