दाकोर (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचा मुद्दा बाजूला ठेऊन या निवडणुकीत स्वत:बद्दलच अधिक बोलत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी मोदी यांना लक्ष्य केले. दुस-या टप्प्यातील निवडणुकीच्या टप्प्यात त्यांनी आज येथे कृष्ण मंदिरात दर्शन घेतले.राहुल गांधी म्हणाले की, भाजपाने नर्मदेच्या मुद्द्यावर प्रचार सुरू केला, पण लोक म्हणाले की, आम्हाला नदीतून पाणी मिळत नाही. त्यानंतर, भाजपाने ओबीसीचा मुद्दा पुढे केला, पण ओबीसी म्हणाले की, भाजपाने आमच्यासाठी काही केले नाही. ते म्हणाले की, मी काल मोदीयांचे भाषण ऐकले. त्यात मोदी हे ९० टक्के स्वत:बाबतच बोलले आहेत. ही निवडणूक मोदी किंवा माझ्याबाबत नाही. भाजपा किंवा काँग्रेसबाबत नाही, तर ही निवडणूक गुजरातमधील नागरिकांच्या भविष्याबाबत आहे. पंतप्रधान मोदी भविष्यातील योजनांबाबत बोलत नाहीत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर गप्प आहेत. पटेल, दलित, अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्या आंदोलनाबाबत मोदी मौन का बाळगून आहेत? असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी चुकीचे शब्द वापरू नयेत. आमचा पक्ष प्रेमळ आणि गोड शब्दानेच भाजपाला पराभूत करेल, असेही ते म्हणाले.राहुल गांधी म्हणाले की, मी एका चहाच्या दुकानात बसलो होतो. हा चहाविक्रेता म्हणाला की, राहुलजी मी १०० रुपयांऐवजी आता फक्त ५० रुपयेच मिळवत आहे. मोदींमुळे आमचे ५० टक्के नुकसान होत आहे. अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या व्यवसायाचा मुद्दाही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. यापूर्वी ते ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असे म्हणत होते. मात्र, आता ते भ्रष्टाचाराबाबत शब्दही बोलत नाहीत, असेही ते म्हणाले.काँग्रेसला सरकार स्थापण्याची आशानवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याने काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची आशा आहे, असे मत पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केले.पहिल्या टप्प्यात शनिवारी २ कोटी १२ लाखांहून अधिक लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावे, हा सत्ताबदलाचा संकेत आहे.पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर हे स्पष्ट दिसत आहे की, परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. गुजरातमधील लोकांच्या आशीर्वादाने आमची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीत मोदी स्वत:बद्दलच बोलत आहेत : राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 1:43 AM