नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या आंदोलनात व स्वातंत्र्योत्तर काळात ज्याप्रकारे पंडित नेहरूंचा नेहरू कुर्ता आणि जवाहर जॅकेट लोकप्रिय ठरले त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातच नव्हे तर परदेशातही खादीची मागणी तिपटीने वाढली. इतकेच नव्हे तर मोदी कुडता आणि मोदी जॅकेटही आज तितकेच लोकप्रिय ठरले आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी ही माहिती देताच सभागृहात काही क्षण हास्याची लकेर उमटली.भाजपचे सदस्य गणेशसिंग यांनी खादी, ग्रामोद्योग संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना कलराज मिश्र म्हणाले, देश व परदेशातल्या जनतेला खादीकडे आकर्षित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सातत्याने चालूच आहेत. तथापि पंतप्रधान मोदींनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात खादीचे किमान एक तरी वस्त्र देशवासियांनी विकत घेऊ न आपल्या घरी न्यावे, असे आवाहन करताच त्याचा व्यापक परिणाम पहायला मिळाला. ‘मोदी तिथे खादी’ असा प्रत्यय सरकारी प्रयत्नांना आला आहे.(विशेष प्रतिनिधी)
मोदी तिथे खादी, जॅकेटच्या विक्रीत वाढ
By admin | Published: December 22, 2015 2:50 AM