नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप सोमवारी जाहीर करण्यात आले. दरम्यान, खातेवाटप जाहीर होताच मंत्री ॲक्शन मोडमध्ये आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि आयटी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर अनेक मंत्री आज पदभार स्वीकारतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सकाळी साडे दहा वाजता साऊथ ब्लॉकमध्ये आपल्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
आरोग्य मंत्री जेपी नड्डा हे निर्माण भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर सकाळी ११.४५ वाजता मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारतील. अश्विनी वैष्णव या मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता आयटी मंत्रालयाचा पदभार स्वीकारणार आहेत. तर दुपारी १२ वाजता ते रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारतील. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना आता केंद्रात मंत्री करण्यात आले आहे. खट्टर आज सकाळी १०.१५ वाजता श्रमशक्ती भवनात मंत्रालयाचा पदभार स्वीकारतील.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह मंगळवारी सकाळी साडेसात वाजता आपल्या दिल्लीतील निवासस्थान २३ बलवंत राय मेहता लेन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड माँ या मोहिमेच्या नावाखाली रोपटे लावतील. यानंतर ते सकाळी ९ वाजता परिवर्तन भवन येथे पदभार स्वीकारतील. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग सकाळी ९.३० वाजता पंचशील भवन, सिरी फोर्ट रोड येथे पदभार स्वीकारतील.
किरेन रिजिजू आजच मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत मंगळवारी सकाळी ११ वाजता शास्त्री भवनाच्या सी विंगच्या खोली क्रमांक ५०१ मध्ये पदभार स्वीकारतील. ज्योतिरादित्य सिंधिया सकाळी ११.२० वाजता संचार भवन येथे संचार मंत्रालयाचा पदभार स्वीकारतील. तर किरेन रिजिजू मंगळवारी सकाळी १०.३० वाजता संसद भवनातील खोली क्रमांक ६० मध्ये आपल्या मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारतील. यासोबतच मोदी सरकारमधील इतर अनेक मंत्रीही लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
CCS मध्ये कुठलाही बदल केलेला नाही मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक (CCS) समितीमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीमध्ये गृह, संरक्षण, वित्त आणि परराष्ट्र मंत्रालयांचा समावेश होतो. सुरक्षेशी संबंधित बाबींवर निर्णय घेणारी ही सर्वोच्च समिती आहे. यंदाही या चार खात्यांच्या मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. खातेवाटपानुसार, गृहखाते अमित शाहांकडे, संरक्षण खाते राजनाथ सिंह यांच्याकडे, अर्थ खाते निर्मला सीतारामन यांच्याकडे आणि परराष्ट्र खाते एस जयशंकर यांच्याकडे असणार आहे.
पंतप्रधान मोदींकडे कोणते विभाग?विशेष बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे आणि कोणत्याही मंत्र्याला न दिलेले सर्व विभाग स्वतःकडे ठेवले आहेत.