नवी दिल्ली : २-जी घोटाळ्याच्या तपासातून सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांना दूर ठेवल्याने उद््भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सिन्हा यांना निवृत्तीच्या तोंडावर बडतर्फ करण्याऐवजी यापुढेही पदावर राहायचे की नाही याचा निर्णय सिन्हा यांच्यावरच सोपविण्याचे सरकारने ठरविले असल्याचे समजते.म्यानमार, आॅस्ट्रेलिया व फिजी या तीन देशांचा १० दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी दिल्लीला परतले आणि लगेच सर्वोच्च न्यायालयाने सिन्हा यांना हा दणका दिला. सूत्रांनुसार मोदी यांनी लगेच वरिष्ठ अधिकारी व निवडक सहकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. खास करून सिन्हा यांना निवृत्त व्हायला केवळ सात दिवस शिल्लक असताना त्यांना पदावरून दूर करावे का, याचा साधकबाधक विचार केला गेला. अखेर याचा निर्णय स्वत: सिन्हा यांच्या विवेकबुद्धीवरच सोडणे इष्ट होईल, असे ठरल्याचेसमजते.मात्र राजीनामा न देता निवृत्तीच्या दिवसापर्यंत पदावर कायम राहण्याचा सिन्हा यांचा मानस असल्याचे संकेत आहेत. सर्वोच्च न्यायालयातून परतल्यावर सिन्हा यांनी आपल्या वकिलांशी व सीबीआयमधील विश्वासू सहकाऱ्यांशी सल्लामसलत केली व स्वत:हून राजीनामा देण्याचे काहीच कारण नसल्याचे त्यांनी ठरविले असल्याचे समजते.सिन्हा यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या एरवी निष्कलंक करियरला शेवटच्या टप्प्याला असे गालबोट लागल्याने त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याविषयी उत्कंठा वाढली आहे. सीबीआय संचालकाची निवड पंतप्रधान, सरन्यायाधीश व लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा समावेश असलेली समिती करते. सध्या लोकसभेत कोणीही विरोधी पक्षनेता नाही. (विशेष प्रतिनिधी)
मोदींनी आढावा घेऊन निर्णय सिन्हांवर सोडला
By admin | Published: November 21, 2014 3:13 AM