हरिश गुप्ता / मेहसाणा/नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते २०१३-२०१४ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना दलाली म्हणून कोट्यवधी रुपये घेतले असा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी गुजरातच्या मेहसाणामधील जाहीर सभेत केला आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. या हल्ल्याला भाजपनेही तोडीसतोड उत्तर देत नॅशनल हेराल्डच्या पाच हजार कोटी रुपयांच्या खटल्यात राहुल गांधी जामिनावर असून त्यांचे कुटुंबीय आॅगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात गुंतलेले आहेत, असा प्रत्यारोप केला. राहुल गांधींनी केलेल्या आरोपाला तोंड देण्यासाठी भाजपने एकामागून एक नेते उतरवले व त्यांनी निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाच्या सत्यासत्यतेबद्दल भाष्य करण्यास नकार देताना, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, असे भाजपा नेते म्हणाले. मोदींच्या विरोधातील असलेली माहिती मी जाहीर केली तर भूकंप होईल, असा दावा राहुल यांनी गेल्या आठवड्यात केला होता. मात्र त्यांनी आज जाहीर केलेल्या माहितीचे प्रकरण वरिष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी आधीच सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केलेला आहे. सुनावणीसाठी ११ जानेवारी हा दिवस निश्चित केला आहे.मोदींनी ४० कोटींचा खुलासा करावामेहसाणाच्या सभेत राहुल गांधी म्हणाले, सहारा ग्रुपने नऊ हप्त्यांमध्ये मोदी यांना ४० कोटी रुपये दिले. पैसे दिल्याच्या डायरीतील नोंदी या बरोबर आहेत की नाही याचा खुलासा मोदी यांनी करावा. नोव्हेंबर २०१४ मध्ये प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी कंपनीवर छापा टाकल्यानंतर आणखी चौकशी व्हावी अशी शिफारस केली होती. पुढे चौकशी झाली की नाही हे कोणालाही माहिती नाही. मोदी मुख्यमंत्री असताना त्यांना कोट्यवधी रुपये देणाऱ्या आणखी एका उद्योगाचे नाव राहुल गांधी यांनी जाहीर केले. मला लोकसभेत बोलू दिले नाही म्हणून मी ही माहिती आज येथे जाहीर करीत आहे, असा खुलासाही त्यांनी केला.मोदी आता याची चौकशी करणार का?मोदी यांच्यावर राहुल यांनी अतिशय सावधपणे वरील आरोप केले. मला स्वतंत्रपणे चौकशी हवी आहे. मोदीजींनी समोर येऊन देशाला काय ते सांगावे, असे ते म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही स्पष्ट केले की मोदीजींनी सहाराकडून पैसे स्वीकारले की नाही एवढेच राहुल विचारत आहेत. हा दस्तावेज प्राप्तीकर खात्याकडे असेल तर मोदी चौकशी करतील का?चौकशी अहवालावर भाजपाचे भाष्य नाहीज्या उद्योगांवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकून चौकशी केली होती ती माझ्या हाती असल्याचे संकेत राहुल गांधी यांनी या जाहीर मेळाव्यात दिले. बहुधा याचमुळे ‘त्या’ दिलेल्या पैशांच्या अधिकृतपणे झालेल्या चौकशी अहवालावर कायदा आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद किंवा प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांच्यासह भाजपच्या कोणत्याही नेत्याने भाष्य केलेले नाही. रवी शंकर प्रसाद म्हणाले की, प्राप्तीकर खात्याने आपले काम केलेले असेलच व सर्वोच्च न्यायालयात त्यावर तीनवेळा सुनावणीही झाली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर काहीही बोलणार नाही.
मोदींनी कोट्यवधींची दलाली घेतली
By admin | Published: December 22, 2016 4:59 AM