ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ८ - भारताला चीनवर टक्कर द्यायची असेल तर कौशल्य, वेग आणि प्रमाण या त्रिसुत्रीवर भर द्यायची गरज आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे. केवळ पदवी घेऊन तरुणाई यशस्वी होणार नसून त्यांच्यात विशेष कौशल्य असणे गरजेचे आहे असेही मोदींनी म्हटले आहे.
विवेक देबोरॉय यांच्या पुस्तकाचे रविवारी संध्याकाळी दिल्लीतील सात रेसकोर्स येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सध्या चीनचे परराष्ट्र मंत्री वांग ई हे भारत दौ-यावर असतानाच मोदींनी चीनला आर्थिकदृष्ट्या टक्कर देण्यासाठी त्रिसूत्रीच मांडली. यात मोदींनी भारताच्या आर्थिक प्रगतीवर भाष्य केले. चीनला मागे टाकण्यासाठी देशात कौशल्य, वेग आणि प्रमाण या तीन गोष्टींवर भर द्यायची गरज आहे असे मत त्यांनी मांडले. देशात तरुणांची संख्या जास्त असून या तरुणांसाठी मनुष्यबळ विकासावर भर देणे गरजेचे आहे. केवळ पदवीचे प्रमाणपत्र घेऊन तरुण यशस्वी होणार नाही. त्यासाठी तरुणांनी विशेष कौशल्य आत्मसात करावे असे त्यांनी सांगितले.
सौरउर्जेवर भर देण्यासोबत उर्जा क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण व्हायला हवे. जलसंवर्धन करण्याची आवश्यकता आहे असे सांगतानाच मोदी म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगवर भारताने पाश्चिमात्त्य देशाच्या दृष्टीने न बघता स्वतःची एक भूमिका घेऊन त्यादृष्टीने काम करावे.