ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - हाफिज सईद पुरस्कृत तेहरीक ए आझादी - जम्मू अँड काश्मिर या संघटनेवर पाकिस्तानने बंदी घातली आहे. जमात उद दावा या मुंबईवरील हल्ल्याची सूत्रधार असलेल्या या संस्थेचं बारसं तेहरीक ए आझादी नावानं करण्यात आलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीमुळे धसका घेत पाकिस्ताननं ही बंदी घातल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल काउंटर टेररिझम अथॉरिटी या संस्थेच्या वेबसाईटवर बंदी घातलेल्या संघटनांच्या यादीमध्ये या संस्थेचं नाव सामील करण्यात आलं आहे. जमात उद दावा ही संघटना निरीक्षणाखाली असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. जानेवारीमध्ये हाफीज सईदला नजरकैदेत ठेवण्यात आलं परंतु ही केवळ धुळफेक असल्याचं दिसून आलं होतं. सईदच्या व तेहरीक ए आझाद एकाश्मिरच्या कारवायांवरती पुरेसा आळा बसला नव्हता. आता मात्र ही संघटना बंदीच्या कारवाईत सापडल्यामुळे ठोस पावले पाकिस्तान सईदविरोधात उचलत असल्याचे दिसत आहे. हा परिणाम ट्रम्प मोदी भेटीमुळे घडला असावा असा जाणकारांचा अंदाज आहे.
आणखी वाचा:
इस्लामाबादनं दहशतवादाला थारा देऊ नये यासाठी ट्रम्प प्रशासनाने कठोर पावले उचलली असून पाकिस्तानला पुरवण्यात येणारी रसद कमी करण्यासारख्या योजनांचा यात समावेश आहे. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानने दहशतवादी असल्याचा संशय असलेल्या 5000 जणांची बँक खाती गोठवली आहेत. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर निर्बंध घातल्यामुळे पाकिस्तानने ही पावले उचलली असून सईदच्या विरोधातली कारवाई त्याचाच एक भाग आहे.
पाकिस्तान दहशतवाद्यांना थारा देत असल्याचा आरोप भारत अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील राजकीय नेत्यांनी अनेकवेळा केला आहे. जमात उद दावा सारख्या संघटनांना पाठिशी घालणं म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासारखंच असल्याचंही या देशांनी पाकिस्तानला बजावलेलं आहे. लष्कर ए तय्यबाच्या मुशीतून जमात उद दावा तयार झाली तर बंदीनंतर तिचंच नाव तहरीक ए आझादी ए काश्मिर असं करण्यात आलं. भारतामध्ये दहशतवादी कारवाया करणं हेच या संघटनांचं मुख्य उद्दिष्ट्य आहे.