ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 13 - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जूनला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा मोदी यांचा हा पहिला अमेरिका दौरा आहे. मोदींच्या ट्रम्प भेटीमुळे भारतीयांना अमेरिकेत नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रेस सेक्रेटरी सीन स्पाइसर यांनीही मोदींच्या ट्रम्प भेटीमुळे भारतीयांना अमेरिकेत रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध होतील असं म्हटलं आहे. मोदी-ट्रम्प भेटीविषयी माहिती देताना सीन स्पाइसर यांनी ही माहिती दिली.
ट्रम्प "बाय अमेरिकन हायर अमेरिकन" ही नीति पुढे नेत आहेत. या नीतिमुळे भारतीयांमध्ये घबराट निर्माण झाली असल्याच्या प्रश्नावर बोलताना स्पाइसर म्हणाले, अमेरिकेच्या मदतीमुळे नैसर्गिक वायूसह अमेरिकेतील ऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने पंतप्रधान मोदींच्या नव्या भारताचा दृष्टीकोन तयार करण्यात आणि अमेरिकेत हजारो नोक-यांची संधी उपलब्ध होत आहे.
आतापर्यंत तीन वेळा मोदी आणि ट्रम्प या नेत्यांनी फोनवरुन चर्चा केली आहे. संरक्षण क्षेत्रात भागीदारी वाढवताना भारत-अमेरिका संयुक्त उत्पादन कार्यक्रम हा सुद्धा मोदी यांच्या दौ-यात महत्वाचा मुद्दा असेल. युद्ध वाहने, हॅलिकॉप्टर, टेहळणी उपकरणे संयुक्तपणे विकसित करण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे. यासंबंधी करार होऊ शकतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबर 2014 ते 2016 दरम्यान मोदींच्या आठ बैठका झाल्या. मोदी तीनवेळा अमेरिका दौ-यावर गेले. ओबामा 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीकडे सर्वांचेच लक्ष आहे. राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यापासून ट्रम्प यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले आहेत.
दहशतवादाच्या मुद्यावर ट्रम्प यांनी भारताला अनुकूल भूमिका घेतली असली तरी, पॅरिस हवामान करारातून माघार घेताना त्यांनी भारतावर कडाडून टीका केली होती. त्यामुळे मोदी यांच्या अमेरिका दौ-याबद्दल सांशकता निर्माण झाली होती. पण सरकारने मोदी अमेरिका दौ-यावर जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. पॅरिस हवामान करारातून भारत आणि चीनला अब्जाववधी डॉलर्स मिळणार आहेत असे भारताला दुखावणारे विधान त्यांनी केले होते.
अमेरिकेने अशी तडकाफडकी माघार घेतल्यानंतरही मोदींनी पॅरिस हवामान करारातील नियम आणि अटींचे पालन करणार असल्याचे म्हटले होते. मोदी यांचा अमेरिका दौरा अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे. दहशतवाद, अफगाणिस्तान यासह एच-1 बी व्हिसा, व्यापार आणि संरक्षण भागीदारी या महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. ट्रम्प प्रशासनाने एच-1 बी व्हिसा नियम कठोर केल्याने भारतीय आयटी उद्योगाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. या जाचक नियमांमधून कसा मार्ग काढता येईल यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल.