नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या दौऱ्यावर आलेले तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यीप ईर्दोगान यांनी सोमवारी नवी दिल्ली येथील बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत सुरक्षा आणि व्यापार या प्रमुख क्षेत्रांसह परस्परांच्या चिंतेचा विषय असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही उभय नेत्यांनी चर्चा केली. दहशतवादविरोधी कारवाई करण्याबाबत द्विपक्षीय सहकार्य बळकट करणे, भारताचा एनएसजीचे सदस्यत्व मिळविण्याचा प्रयत्न आणि प्रादेशिक सुरक्षा यासह इतर अनेक प्रमुख मुद्यांवर मोदी-ईर्दोगान यांच्या भेटीत चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. हैदराबाद हाऊस येथे ही बैठक पार पडली. पंतप्रधान मोदी यांनी ईर्दोगान यांचे स्वागत केले, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी टिष्ट्वटरवर सांगितले. दरम्यान परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही ईर्दोगान यांची भेट घेतली.भारताच्या दौऱ्यावर आलेल्या महत्त्वाच्या पाहुण्यांचे अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रतिनिधी मंडळस्तरीय चर्चेच्या आधी अध्यक्ष ईर्दोगान यांचे स्वागत केले, असे बागले यांनी म्हटले आहे. १६ एप्रिल रोजी वादग्रस्त सार्वमत जिंकल्यानंतर ईर्दोगान यांनी भारताला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. ते दोन दिवसांच्या भारत भेटीवर रविवारी नवी दिल्लीत आले होते.(वृत्तसंस्था)
मोदी, तुर्की अध्यक्षांनी घेतला सुरक्षेचा आढावा
By admin | Published: May 02, 2017 1:04 AM