Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदान झाले असून, अजून दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. यातून ते सातत्याने केंद्र सरकारच्या विविध योजनांवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. भाजपला संविधान आणि लोकशाही नष्ट करायची आहे, असा आरोप करत राहुल गांधींनी केंद्राच्या अग्निवीर योजनेवरही हल्लाबोल केला.
राहुल गांधींनी आज हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा अग्निवीर योजनेला विरोध केला. या योजनेवर राहुल गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले की, आजच्या केंद्र सरकारने भारतातील सैनिकांना मजूर बनवले आहे. या नवीन धोरणामुळे आता देशात दोन प्रकारचे सैनिक निर्माण होतील. एक सैनिक ज्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळेल, त्याला शहीदाचा दर्जाही मिळेल आणि दुसरा सैनिक ज्याच्या कुटुंबाला या योजनेत काहीही मिळणार नाही.
देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर सर्वात आधी ही अग्निवीर योजना बंद केली जाईल. आमचे सरकार सर्वांना समान सुरक्षा देईल. सर्वांना समान सुविधा मिळतील. सैन्यात कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही. शहीदांचा एकच प्रकार असेल. त्याच प्रकारच्या सेवाशर्ती लागू होतील. सर्व कुटुंबांना काही ना काही पेन्शन मिळेल, प्रत्येकाला शहीदाचा दर्जा मिळेल, असे आश्वासन राहुल गांधींनी यावेळी दिले.
ते पुढे म्हणाले की, मी भारत जोडो यात्रात देशभरात हजारो किलोमीटरचा प्रवास केला. मला हजारो लोक भेटले आणि त्यांनी महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर खुलेपणाने आपले म्हणने मांडले. मात्र सध्याच्या सरकारला महागाई आणि बेरोजगारीशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.