लखनौ - बुधवारी लखनौमधील काँग्रेसच्या मुख्यालयाच्या आवारात नरेंद्र मोदींना फिरताना पाहून तिथे उपस्थित असलेल्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे काय काँग्रेसच्या मुख्यालयात येऊ शकतात? असा प्रश्न सर्वांना पडला. मात्र काही वेळातच सत्य समोर आले. काही वेळाने हे गृहस्थ पंतप्रधान नरेद्र मोदी नसून, त्यांच्यासारखे दिसणारे अभिनंद पाठक असल्याचे उघड झाले. ते काँग्रेसचे उत्तर प्रदेश अध्यक्ष राज बब्बर यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात आले होते. त्यानंतरही आमचे 15 लाख रुपये कधी देणार? असा सवाल करत उपस्थितांनी त्यांच्या प्रश्नांची सरबत्ती केली. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत असलेला प्रश्नांचा मारा पाठक यांनी शांतपणे ऐकून घेतला. त्यानंतर "या प्रश्नांमुळेच मला स्वत:ला काँग्रेसमध्ये यावे लागले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात प्रचार करण्याचा आपला मानस आहे," असे त्यांनी सांगितले. सहारनपूर येथील रहिवासी असलेले अभिनंद पाठक पुढे म्हणाले की, "2015 ची दिल्ली विधानसभा आणि 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने माझा पुरेपूर वापर करून घेतला." एकेकाळी भाजपाच्या प्रचार सभांचे आकर्षण ठरलेल्या अभिनंद पाठक यांनी 1999 साली लोकसभा आणि 2012 साली विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्याशिवाय त्यांनी सहारनपूर येथून दोन वेळा नगरसेवक म्हणूनसुद्धा प्रतिनिधित्व केले आहे. "मी स्वत: मोदींचा पाठीराखा आहे. ते मला भेटले होते, माझी गळाभेटही त्यांनी घेतली. पण त्यांचे सरकार निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळेच मी भाजपाविरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मी राज बब्बर यांना राहुल गांधी यांच्याशी भेट घालून देण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी माझी इच्छा त्यांना सांगू शकेन." सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपा सरकारबाबत प्रचंड राग असल्याचेही पाठक यांनी सांगितले. "अच्छे दिनच्या अपेक्षेने जनतेने मोदींना निवडले होते. मात्र काळानुसार परिस्थिती बिघडत गेली. त्यामुळेच सर्वसामान्य लोकांचा मोदींवरील विश्वास उडाला आहे. आता तर लोक इतके त्रस्त आहेत की ते मला वाईटसाईट बोलून मारायलाही धावतात, असे पाठक म्हणाले.
काँग्रेस मुख्यालयाच्या आवारात फिरताना दिसले 'मोदी', लोकांनी विचारले 15 लाख कधी देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 11:02 AM