नवी दिल्ली - भाजपा नेते आणि खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदींचे तोंड भरुन कौतुक केले आहे. माझ्या कुटुंबातही काहीजण पंतप्रधान होते, पण मोदींनी देशाला जो सन्मान दिला, तो कित्येक वर्षांपासून कुणीही देऊ शकलं नाही. मोदी केवळ देशासाठी जगत असून देशासाठीच मरत आहेत. मोदींना केवळ देशाचीच चिंता आहे, असे वरुण गांधींनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथील खासदार आणि पीलभीत लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार वरुण गांधींनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. रविवारी पीलभीत येथे एका प्रचारसभेत बोलताना गांधींनी मोदींचे कौतुक केले. तसेच, गांधी घराण्यातील पंतप्रधानांशी तुलना करताना, मोदींनी देशाला त्यांच्यापेक्षा अधिक सन्मान मिळवून दिल्याचंही वरुण गांधींनी म्हटलं आहे. वरुण गांधी हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नातू असून राहुल गांधींचे चुलत बंधू आहेत. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधींकडे काँग्रेसची धुरा देण्यात आली. त्यामुळे या दोन कुटुंबात वादाची ठिणगी पडली. सध्या भाजपमध्ये असलेल्या वरुण गांधींनी मोदींचे भरपूर कौतुक केलं आहे. मी अनेकदा पंतप्रधान मोदींना भेटलो, प्रत्येकवेळी मला त्यांच्यातील नेत्यासोबत एका माणसाचे दर्शन घडले. ते नेहमीच माझ्या पाठिशी वडिलांप्रमाणे उभे राहिलेत. मी 15 वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला. मात्र, मी जेव्हा राजकारण सोडेल तेव्हा सन्यास घेईन, असेही वरुण गांधींनी सांगितले.
2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी सुल्तानपूर येथून निवडणूक लढविणारे वरुण गांधी यंदा पीलभीत येथून लोकसभेच्या मैदानात आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षात असता तेव्हा निर्णय तुमच्या नेतृत्वावर सोडावे लागतात. मला सुल्तानपूर ऐवजी पिलिभीतमधून लढण्यास सांगण्यात आले. माझ्यासाठी सुलतानपूरही घर आहे आणि पिलिभीतही, असे म्हणत त्यांनी आपल्या बदललेल्या उमेदवारीचे समर्थन केले आहे.