- हरिश गुप्ता, नवी दिल्ली
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर व गोवा या पाच राज्यांपैकी केवळ गोव्यात आता भाजपाचे सरकार होते. तिथे तोच पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हे एक्झिट पोल व्यक्त करीत आहेत. पंजाबमध्ये अकाली दलाबरोबर भाजपा सत्तेत होती. पण तिथे दोन्ही पक्ष दणकून मार खातील आणि काँग्रेस व आप यांच्यापैकी एकाला बहुमत मिळेल, असे हे पोल सांगतात. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्षाला ११0 ते १६९च्या दरम्यान जागा मिळतील, असे हे पोल म्हणतात. तिथे भाजपाला १५५ ते २१0च्या दरम्यान जागा मिळतील, असे या सर्व्हेवरून दिसते. केवळ एकाच पोलमध्ये तिथे भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त झाली असली तरी अन्य पोलनुसार भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, पण बहुमत मात्र मिळणार नाही, असे दिसते. मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण तो पक्ष तिथे मागे पडेल, असे पोल सांगतात. म्हणजेच आसाम, अरुणाचल प्रदेश यानंतर ईशान्येकडील आणखी एका राज्यात भाजपा शिरकाव करेल. हे पोल जाहीर होत असतानाच अखिलेश यादव यांनी आम्ही उत्तर प्रदेशात कदापि भाजपाचे सरकार बनू देणार नाही, त्यासाठी प्रसंगी मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीशी समझोता करू, असे बीबीसीला सांगितले आहे. याचाच अर्थ सपाला बहुमत मिळणार नाही, हे जणू त्यांनी मान्यच केल्याचे दिसते. बहुतेक सगळ्या एक्झिट पोल्सच्या निष्कर्षांचे भाकीत हे उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा जिंकणारा ठरवत आहेत. ४०३ जागांच्या उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपा १६५-१८५ दरम्यान जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरेल. याच पद्धतीने बहुतेक सगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांनी भाजपाला किंवा समाजवादी पक्ष-काँग्रेस युती किंवा बहुजन समाज पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असेच म्हटले आहे. उत्तर प्रदेशात त्रिशंकू अवस्था निर्माण होईल, असे अंदाज व्यक्त झाले होते. परंतु आता सर्वांत जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणजे भाजपा असू शकेल. बसपला तिसरे स्थान मिळेल. तथापि, उत्तराखंडमध्ये भाजपाला हरीश रावत यांच्या राजवटीला सत्तेवरून खेचण्याइतपत बहुमत मिळेल, असे सर्व्हे सांगत आहेत. म्हटजे तिथे भाजपाला २९ ते ५३ जागांची शक्यता पोल्सनी व्यक्त केली आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये अनेक वाहिन्यांनी एक्झिट पोल्स घेतले मात्र त्यात एकवाक्यता नाही. तथापि, बऱ्याच वाहिन्यांचे भाकीत भाजपा हा गोवा व मणिपूरमध्येही सर्वांत जास्त जागा जिंकणारा ठरेल, असे आहे. मणिपूरमध्ये १५ वर्षे काँग्रेसची सत्ता आहे. येथे दोन वाहिन्यांनी काँग्रेसला पसंती दिली आहे तरी कोणत्याही सर्व्हेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असे भाकीत केलेले नाही.पंजाबमध्ये सर्वांत जास्त फटका भाजपाला बसण्याचे भाकीत एक्झिट पोल्समध्ये व्यक्त झाले आहे. इंडिया टीव्ही-सी व्होटरने आम आदमी पक्षाला ६२ ते ७१ जागा दिल्या आहेत तर इतर दोन एक्झिट पोल्सनी काँग्रेस आणि ‘आप’ला प्रत्येकी ५४-५५ जागा दिल्या आहेत. अकाली दल-भाजपाला दोनअंकी जागाही मिळण्याची शक्यता दिसत नाही. इंडिया टुडे-अॅक्सिस पोलने काँग्रेसला ५९-६७ जागांचे भाकीत केले आहे.यूपीची लढाई नरेंद्र मोदींसाठी होती प्रतिष्ठेचीउत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळविणे भाजपा आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिष्ठेचे केले होते. मोदी यांनी तिथे सात सभा घेतल्या होत्या आणि तीन दिवस ते वाराणसीमध्ये मुक्काम ठोकून होते. भाजपाच्या जवळपास सर्वच मोठ्या नेत्यांनी तिथे सभा घेतल्या होत्या.