ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - तब्बल तीन वर्षांपुर्वी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारने निवडणूक जिंकत केंद्रात सत्ता मिळवली. एकीकडे तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण होत असल्याने केंद्र सरकार आपण केलेल्या कामांचा प्रचार करत असताना दुसरीकडे विरोधक मात्र केंद्र सरकारचा कुचकामीपणा लोकांसमोर आणण्याचा दावा करत आहे. दरम्यान एका सर्व्हेनुसार 2014 प्रमाणे अद्यापही मोदी लाट कायम आहे. जर आजच्या घडीला निवडणुका घेतल्या तर मोदी सरकारच सत्तेवर येईल असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे.
एनडीए पुन्हा पार करेल 300 चा आकडा
एबीपी न्यूज-सीएसडीएस- लोकनितीने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज निवडणुका झाल्यास एनडीएला 331 जागा मिळू शकतात. 2014 मध्ये एनडीएला 335 जागा मिळाल्या होत्या. युपीएसाठी 104 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2014 शी तुलना करता 44 जागा जास्त दाखवण्यात आल्या आहेत. एनडीएच्या मतांमध्ये सात टक्क्यांची वाढ दाखवण्यात आली आहे.
कसा करण्यात आला सर्व्हे
एबीपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार 1 मे ते 15 मे दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. यासाठी 19 राज्यांमधील लोकांशी बातचीत करण्यात आली. मतदान केंद्रांवरील 11 हजार 373 लोकांची मत जाणून घेण्यात आली आणि त्यानंतर हा निकाल आला.
पूर्व भारतात एनडीएला जास्त जागांचा अंदाज
एबीपी न्यूज-सीएसडीएस- लोकनितीच्या सर्व्हेनुसार बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड आणि पुर्वेकडील राज्यांमध्ये एनडीएला 2014च्या तुलनेत जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. या राज्यांमध्ये लोकसभेच्या 142 जागा आहेत. सर्व्हेनुसार एनडीएला 71 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो 2014 च्या तुलनेत 16 जागांनी जास्त आहे. युपीएला मात्र याठिकाणी 25 जागांचा तोटा होऊ शकतो. 2014 मध्ये युपीएला 28 जागा मिळाल्या होत्या. आज निवडणूक झाल्यास इतर खात्यांमध्ये 46 जागा येऊ शकतात, ज्या 19 ने कमी आहेत. पूर्व भारतात एनडीएच्या मतांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
बिहार आणि झारखंडमध्ये मात्र एनडीएला नुकसान होऊ शकतं. सर्व्हेनुसार भ्रष्टाचाराचे आरोप झाले असले तरी लालूप्रसाद यादव यांना मात्र याचा फटका बसणार नाही. तसंच उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाबसारख्या उत्तर भारतातील राज्यांमध्ये एनडीएला काही जागांचं नुकसान होऊ शकतं. उत्तर भारतातील एकूण 151 जागांपैकी एनडीएला 116 जागा मिळू शकतात, ज्या 2014 च्या तुलनेता 15 ने कमी आहेत. युपीएला 15 जागा मिळू शकतात. त्यांना नऊ जागांचा फायदा होऊ शकतो. सर्व्हेनुसार हरियाणा, पंजाबमध्ये एनडीएला नुकसान होऊ शकतं. उत्तर भारतात एनडीएला 50 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे, तर युपीएला 18 टक्के मतदान होऊ शकतं.