ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - सोशल मीडियाद्वारे जनतेशी थेट संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी इनस्टाग्रामवर जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणारे नेते बनले आहेत. गेल्या वर्षी 3 नंबरवर असणा-या मोदींना यंदा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कडवी टक्कर दिली. फोटो शेअरिंग वेबसाइट इस्टाग्रामवर पंतप्रधान मोदींचे तब्बल 69 लाख फॉलोअर्स झाले आहेत.
विशेष म्हणजे गेल्या 12 महिन्यात मोदींनी केवळ 53 फोटो पोस्ट केले आहेत. त्यांच्या एका पोस्टला सरासरी 1 लाख 41 हजार कमेंट आणि लाइक येतात. त्यांच्यानंतर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आहेत. प्रतिष्ठित पीआर फर्म बर्सन मार्सटेलरद्वारा हे सर्वेक्षण करण्यात आलं. वर्ल्ड रॅंकिंगमध्ये ट्रम्प यांचे 63 लाख फालोअर्स आहेत. तर तिस-या नंबरवर पोप फ्रान्सिस आहेत त्यांचे 37 लाख फॉलोअर्स आहेत. मोदींनंतर पोप फ्रान्सिस यांची पोस्ट सर्वाधिक लाइक केली जाते, त्यांच्या एका पोस्टला 1 लाख 38 हजार कमेंट आणि लाइक येतात.
याशिवाय इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विदोदो यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत सर्वाधिक झपाट्याने वाढ होत आहे. 34 लाख फॉलोअर्ससह ते पाचव्या नंबरवर आहेत. या सर्वेक्षणात जगभरातील 325 राष्ट्रप्रमुख आणि सरकारच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा गेल्या 12 महिन्यातील डेटाचा अभ्यास करण्यात आला.