नवी दिल्ली - आज 16 मे. बरोब्बर पाच वर्षांपूर्वी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस खास ठरला होता. 16 मे 2014 रोजी सोळाव्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले होते. या निकालांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाने विरोधकांचे आव्हान उद्ध्वस्त करून केंद्रातील सत्ता हस्तगत केली होती. विशेष बाब म्हणजे तब्बल 30 वर्षांनंतर प्रथमच देशामध्ये स्पष्ट बहुमतासह सरकार बनले होते.1984 नंतर प्रथमच देशात कुठल्याही एका पक्षाला मिळालेल्या स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन झाले होते. तसेच 1980 मध्ये स्थापना झालेल्या भारतीय जनता पक्षालाही प्रथमच केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाले होते. तेव्हा सत्तेवर असलेल्या यूपीए सरकारविरोधात असलेल्या वातावरणामुळे भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत होता. मात्र भाजापला स्वबळावर बहुमत मिळेल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र या विजयानंतर भाजपाने आक्रमक पवित्र्यासह देशात पक्षविस्ताराला सुरुवात केली होती. सोळाव्या लोकसभेसाठी 7 एप्रिल 2014 ते 12 मे 2014 या दरम्यान नऊ टप्प्यात मतदान झाले होते. एकूण नऊ फेऱ्यांमध्ये झालेल्या मतदान प्रक्रियेत सुमारे 66.38 टक्के लोकांनी मताधिकाराचा वापर केला होता. मतमोजणीमध्ये भाजपाला 282 जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले. तर काँग्रेसची 44 जागांवर घसरगुंडी उडाली होती. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 59 जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेसनंतर 37 जागा जिंकून अण्णा द्रमुक हा तिसरा पक्ष बनला होता. तर तृणमूल काँग्रेसला 34, बीजू जनता दलला 20, शिवसेनेला 18, तेलुगू देसम पक्षाला 16, तेलंगणा राष्ट्र समितीला 11 जागा मिळाल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला 6, समाजवादी पक्षाला पाच तर आपला चार जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला 31.1 टक्के, काँग्रेसला 19.3 टक्के मते मिळाली होती. बसपाला 4.1 टक्के, तृणमूल काँग्रेसला 3.8 टक्के, समाजवादी पक्षाला 3.4 टक्के, अण्णा द्रमुकला 3.3 टक्के, सीपीआय एम ला 3.3 टक्के तर इतक पक्षांना 31.8 टक्के मते मिळाली होती. सोशल मीडिया आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा सर्रासपणे झालेला वापर. नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या झंझावाती सभा हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले होते. तर विविधा घोटाळ्यांच्या जंजाळात अडकलेल्या डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, आता 17 व्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, 23 मे रोजी लागणाऱ्या निकालामध्ये नरेंद्र मोदी 2014 प्रमाणेच चमत्कार दाखवणार की काँग्रेस भाजपाला धक्का देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आली होती मोदी लाट; विरोधक झाले होते भुईसपाट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 11:53 AM