नवी दिल्ली - देशात एकीकडे कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच दुसरीकडे देशभरातून ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस)चे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत. काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. या आजारावर उपाय करण्यासाठी देशपातळीवर संशोधन सुरू आहे. मात्र, या आजारावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
जहाँ बिमार, वहाँ उपचार.. हा आपला नवा मंत्र आहे. या सिद्धांतानुसार मायक्रो कंटेंटमेंट झोन बनवून आपण गावागावत औषधे वाटली जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण भागात हे अभियान अधिकपणे व्यापक करायचं आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता ब्लॅक फंगसच्या नवीन आजाराचा सामना आपल्याला करायचा आहे. या नव्या स्ट्रेनला निपटण्यासाठी सावधानी आणि योग्य ती व्यवस्था करण्यासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतील फ्रंटलाईन वर्कर्सशी बोलताना सांगितलं. मात्र, यावरुन राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलंय.
कोरोनानंतर उद्भवत असलेल्या ब्लॅक फंगस रोगावरील उपचारासाठी लवकरच टाळ्या अन् थाळ्या वाजवायची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रंटलाईन वर्कर्सच्या कामाचं कौतुक करण्यासाठी नागरिकांना टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचं आवाहन केलं होत. त्यावेळी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवल्या होत्या. त्यावरुनच, राहुल गांधींनी मोदींनी लक्ष्य केलंय.
मोदीजी, प्रशासनाच्या दुरवस्थेमुळेच केवळ भारतातच ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशात कोरोना लशींचा तुटवडा आहेच, पण त्यासोबतच या नव्या महामारीच्या औषधांचाही तुटवडा आहे. त्यामुळे, या आजाराविरुद्ध लढण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळ्या अन् थाळ्या वाजविण्याची घोषणा करतील, असे ट्विट राहुल गांधींनी केलंय.
इंडस्ट्रीयल ऑक्सिजनमुळे ब्लॅक फंगस
ब्लॅक फंगस हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. मात्र, आता एम्समधील एका ज्येष्ठ महिला डॉक्टरांनी ब्लॅक फंगसच्या फैलावाबाबत धक्कादायक कारण सांगितले आहे. ( Industrial Oxygen Increases Black Fungus Outbreak, Shocking Claim by Senior AIIMS Doctor Uma Kumar) सुरुवातीला ब्लॅक फंगसचे मुख्य कारण हे स्टेरॉइडचा वापर असल्याचे सांगण्यात येत होते. पण दिल्लीच्या एम्समधील डॉक्टर उमा कुमार यांनी हा आजार पसरण्यामागे इतरही अनेक कारणे असल्याचे सांगितले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना मेडिकल ऑक्सिजनऐवजी इंडस्ट्रियल ऑक्सिजन दिल्यामुळे ब्लॅक फंगसचा धोका वाढत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.