नवी दिल्ली - भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार येणार आणि पुन्हा एकदा भाजपा सत्तेत येणार असे सांगण्यात येते. आएगा तो मोदीही असा नारा भाजपाने दिला असून सोशल मीडियासह सर्वत्र हा नारा देण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसने भाजपाच्या या घोषणेची खिल्ली उडवत देशाचे पंतप्रधान पंडित नेहरुंचा एक फोटो शेअर केला आहे.
लोकसभा निवडणुकीत यंदा सोशल मीडिया अत्यंत प्रभावी ठरत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत मेम्स, कार्टुन, स्लोगन आणि क्रिएटीव्ह प्रचार केला जात आहे. तसेच, विरोधी पक्षांना टार्गेटही केले जात आहे. सोशल मीडियाच्या वापरात भाजपा क्रमांक 1 वर असली, तरी काँग्रेसही भाजपाच्या टीकेला जशास तसे उत्तर देत आहे. नेहमीच आपल्या भाषणातून पंडित नेहरुंवर टीका करणाऱ्या मोदींना काँग्रेसने त्यांच्या तोंडून उत्तर दिले आहे.
काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेटमधील मंत्र्यांची बैठक घेत असल्याचे दिसून येते. या बैठकीला सुषमा स्वराज, राजनाथसिंह, निर्मला सितारमण, अरुण जेटलींसह महत्त्वाचे नेते हजर आहेत. मात्र, या फोटोवर एक मजेशीर बाब दिसून येते, ती म्हणजे या फोटोत चक्क पंडित नेहरु दिसत आहेत. मोदींच्या पाठीमागून पंडित नेहरुंचा हसरा चेहरा दिसतो. तसेच, नेहरुंच्या तोंडून 'जाएगा तो मोदीही'... अशी टॅगलाईन वर्तविण्यात येत असल्याचं या फोटोतून दिसून येत आहे. त्यानंतर, ट्विटरवर जाएगा तो मोदीही हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. तर, काँग्रेसच्या या ट्विटला अनेकांनी ट्रोल केलं आहे. भाजपा समर्थकांनी या ट्विटनंतर नेहरुंच्या फोटोचे काही अश्लील मेम्स बनवले आहेत. तर काँग्रेसच्या समर्थकांनीही या फोटोवर नाराजी दर्शवली असून पंडित नेहरुंचा फोटो वापरणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.