नवी दिल्ली : नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर दलितांवरील अत्याचारात वाढ झाली असून कोरेगाव भीमाप्रकरणी त्यांनी धरलेले मौन सोडावं, अशी टीका गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. जिग्नेश मेवाणी यांनी पुण्यातील कोरेगाव भीमाप्रकरणी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मी कोरेगाव भीमा या ठिकाणी कधीही गेलो नाही. ज्यावेळी माझा कार्यक्रम झाला. त्या भाषणात एकही चिथावणीखोर शब्द नव्हता. मात्र याप्रकरणी मला मुद्दाम लक्ष केले जात आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर आणि भाजपावर जिग्नेश मेवाणी यांनी केला.
याचबरोबर, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. दरम्यान, कोरेगाव भीमा प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावं, नाहीतर याचा परिणाम 2019 मध्ये दिसून येईल. येत्या 9 जानेवारीला दिल्लीत युवा हुंकार रॅली काढणार येणार आहे. यावेळी पंतप्रधान कार्यलयात जाऊन एका हातात मनुस्मृती आणि एका हातात संविधान घेऊन जाणार आणि या दोन्हींपैकी कशावर विश्वास ठेवता, असा जाब पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारणार असल्याचे जिग्नेश मेवाणी म्हणाले.
माझ्यासारख्या प्रस्थापित दलित नेत्याला लक्ष्य करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लाखो दलित बांधवांना काय संदेश देत आहेत, असा सवालही केला. तसेच, कोरेगाव भीमा प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे असे सांगत दलित बांधवांनी शांतता राखावी, असे आवाहन केले. याचबरोबर, देश कॅशलेस होण्याआधी कास्टलेस होण्याची आवश्यकता असल्याचे जिग्नेश मेवाणी म्हणाले.