भोपाळ - मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या अडचणीत वाढ करणारे कॅम्प्युटर बाबाने लोकसभा निवडणुकीचे भविष्य वर्तवलं आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान बनणार नाहीत असा दावा कॅम्प्युटर बाबाने केल्यामुळे भाजपामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट दिसत नाही. त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत असं भाकीत कॅम्प्युटर बाबाने वर्तुवल्यामुळे भाजपाची अडचण झाली आहे. कारण या आधी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी कॅम्प्युटर बाबाने केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती. कॅम्प्युटर बाबाने केलेल्या भविष्यवाणीने काँग्रेसच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे तर भाजपात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशच्या शिवराज चौहान यांच्या सरकारच्या नाकात दम आणणारे कॅम्प्युटर बाबाने लोकसभा निवडणुकीतही भाजपाच्या विरोधात विधाने सुरुच ठेवली आहे. काँग्रेसचेभोपाळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार दिग्विजय सिंह यांचा प्रचारदेखील कॅम्प्युटर बाबा करणार आहेत. भोपाळमधून दिग्विजय सिंह यांचा विजय होणार आहे. साधूसंताचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे. त्यामुळे बहुमताने दिग्विजय सिंह भोपाळमधून विजयी होतील तसेच मध्य प्रदेशात 15 जागा काँग्रेसच्या पारड्यात जातील असंही कॅम्प्युटर बाबाने सांगितले आहे.
नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. याआधीही 2018 मध्ये मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅम्प्युटर बाबाने शिवराज चौहान सरकार पडणार आहे, भाजपा राज्यात हरणार अशी भविष्यवाणी केली होती. शिवराज चौहान मुख्यमंत्री बनणार नाहीत त्यांच्या नावामागे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला जाईल असं कॅम्प्युटर बाबाने सांगितले होते. विधानसभा निवडणुकीनंतर नेमकं तसेच घडले. मध्य प्रदेशात भाजपाला काँग्रेसने पराभूत केले. शिवराज चौहान यांचे सरकार पडून काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे कॅम्प्युटर बाबाची भविष्यवाणी खरी ठरतेय की नाही हे आगामी लोकसभा निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईल.