नवी दिल्ली - सीबीआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादाला आता राजकीय रूप मिळू लागले आहे. काँग्रेसने या वादाचा संबंध राफेल विमान कराराशी जोडला असून, देशभरातील सीबीआय कार्यालयांसमोर आंदोलन केले. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या आंदोलनाची सूत्रे आपल्या हाती घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले आहे. सीबीआय प्रमुखांना हटवले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला. सीबीआयप्रमुखांना हटवण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांना आज अटक करण्यात आली होती. दरम्यान, लोधी कॉलनी पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यावर राहुल गांधी यांनी मोदींवर घणाघाती टीका केली. "मोदी पळू शकतात, लपू शकतात, पण शेवटी सत्य समोर येईलच. सीबीआय प्रमुखांना हटवल्यामुळे कोणताही फायदा होणार नाही. पंतप्रधानांनी सीबीआय प्रमुखांविरोधात कारवाई केली. ही अत्यंत घाईगडबडीने केलेली कारवाई आहे. अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
सीबीआय प्रमुखांना हटवले तरी मोदी वाचणार नाहीत, राहुल गांधींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 6:39 PM