ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - न्यूक्लियर सप्लायर ग्रुप (एनएसजी) देशांच्या गटात भारताच्या समावेशाला चीनने पाठिंबा द्यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी २३ जूनला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये ही भेट होणार आहे.
एनएसजीमध्ये भारताच्या समावेशाला चीनचा विरोध आहे. भारताला सवलती देऊन प्रवेश देणार असाल तर, तोच नियम पाकिस्तानलाही लावा अशी चीनची भूमिका आहे. चीनचे मन वळवण्यासाठी भारत कुटनितीक स्तरावर मोठया प्रमाणावर प्रयत्न करत आहे.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीन विरोध करणार नाही असे सांगितल्यानंतर काही तासातच चीनने भारताच्या एनएसजी सदस्यत्वाचा विषय कार्यक्रमपत्रिकेवर नसल्याचे सांगत विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले. शांघाय सहकार्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार आहे. दोन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये चीनचा पाठिंबा मिळवणे मोदींचे मुख्य लक्ष्य आहे.