हरीश गुप्ता, नवी दिल्लीदिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल आता बिहारच्या निवडणूक मैदानात उडी घेत आहेत. त्यांनी जनता दलाच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्याला होकार देत मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जोश वाढविण्याची तयारी चालविली आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जुलैला जाहीरसभा घेत रणशिंग फुंकतील तेव्हा बिहारच्या विकास पॅकेजचे अस्त्र सोडतील अशी अपेक्षा आहे.नितीशकुमार यांनी गेल्या काही महिन्यांत तीनदा केजरीवालांशी फोनवरून संपर्क साधला आहे. धर्मनिरपेक्ष शक्तींच्या विजयासाठी प्रचाराला येण्याचे त्यांचे आवाहन केजरीवालांनी मान्य केल्याचे संकेत मिळाले आहेत. बिहारमधील पराभव भाजपला आणखी कमकुवत करणारा ठरेल. दिल्लीतील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असताना व्यापमं ते ललितगेट प्रकरणांच्या ज्वाळांची धग पंतप्रधान नरेंद्र मोदींना बसली आहे. दिल्लीतील ७० पैकी ६७ जागा पटकावत केजरीवालांनी एकहाती विजय मिळविल्याने नितीशकुमारांनी त्यांना प्रचारासाठी मदतीचा हात मागितला आहे. केजरीवाल काँग्रेसशी नजरानजरही टाळतात. लालूप्रसादांशीही त्यांचे सख्य नाही. अशा वातावरणात केजरीवालांच्या पाठिंब्यासाठी व्यवस्था केली जात आहे. केजरीवालांनी बिहारात प्रचारासाठी काही वेळ द्यावा, असे नितीशकुमारांना वाटते. केजरीवालांनी बिहारमधील काही प्रचारसभांना संबोधित करावे. केवळ नितीशकुमार यांच्यासोबत व्यासपीठावर यावे. लालूप्रसाद यादव किंवा राहुल गांधी त्यावेळी नसतील अशा प्रकारची ती व्यवस्था असेल. केजरीवालांकडे तसा प्रस्ताव आला असून कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नरेंद्र मोदी आणि भाजपचा पराभव करण्यासाठी प्रचारात उतरण्याला केजरीवालांची हरकत नसेल, असे आपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
मोदी वापरणार विकास पॅकेज अस्त्र
By admin | Published: July 19, 2015 11:57 PM