- हरीश गुप्तानवी दिल्ली - ‘ओबामा केअर’च्या धर्तीवर देशातील दहा कोटींहून अधिक गरीब व दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी राष्टÑीय आरोग्य संरक्षण योजना (आयुष्यमान भारत) हे मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पाचे प्रमुख्य वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मोदी केअर जगभरातील सर्वात मोठी आरोग्य योजना मानली जात आहे.काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ग्रामीण रोजगारासाठी मनरेगा ही महत्त्वपूर्ण योजना सुरु केली होती, तर आमच्या सरकारने ग्रामीण भागातील गोर-गरिबांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी मोदी केअर योजना सुरु केली आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर सांगितले.निवडणुकीच्या धामधुमीच्या वर्षांत मांडलेल्या अर्थसंकल्पावर मोदी यांचीच सर्वत्र छाप दिसते. सवलतींना फाटा देणाºया अर्थसकल्पात कर्जमाफीची योजना नाही. मोदी हे क्षणिक लोकप्रिय अर्थसंकल्पाच्या बाजुने नाहीत, असे स्पष्ट करीत जेटली म्हणाले की, यात राजकीय दृढता आणि जनतेच्या आकांक्षेनुरुप नेतृत्वाच्या संकल्पाचे प्रतिबिंब आहे. सार्वत्रिक निवडणुका लवकर घेण्याचा मोदी यांचा विचार दिसतो, असे वाटत असले तरी अर्थसंकल्पातून मात्र तसे कोणतेही संकेत मिळत नाहीत. मे २०१४ मध्ये आखलेल्या रूपरेखेनुसार मोदी-जेटली मार्गक्रमण करीत आहेत, हाच संदेश यातून देण्यात आल्याचे जाणवते. मार्च २०१९ पर्यंत ग्रामीण भागांत एक कोटी घरे उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना, आठ कोटी गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा यांवरून मोदी यांचा लवकर निवडणुका घेण्याचा पक्का मनसुबा दिसतो. याशिवाय ते चार कोटी घरांना मोफत वीज जोडणी देणार असून, यासाठी १६००० कोटी रुपये खर्च करणार आहेत.अर्थसंकल्पात श्रीमंतावर कर लावला असून, कंपनी क्षेत्राच्या पदरीही निराशा आली आहे. जेटली यांचे म्हणणे असे की, मागच्या आर्थिक वर्षात कंपन्या व व्यक्तींनी वित्तीय व शेअर बाजारातून ३.६७ लाख कोटींचा नफा कमावला; परंतु, एक पैसाही दिला नाही. त्यांना आता नफ्यातील काही भाग कर म्हणून द्यावा लागेल. एसटीटीशिवाय १० टक्के दीर्घावधी भांडवली लाभ कर लावण्यात आला आहे. छोट्या गुंतवणुकदारांना शेअर व्यवहारांतून मिळणाºया एक लाख रुपयांच्या नफ्यावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. वेतनधारकांना वैयक्तिक उत्पन्न करात सूट देण्यात आली नसली तर ४० हजार रुपयांपर्यंतच्या प्रमाणित वजावटीतून त्यांना दिलासा देण्यात आला आहे.अरुण जेटलींच्या भाषणाची विवेकानंद वचनाने सांगता‘मला खात्री आहे, आपल्या स्वप्नातील भारताची निर्मिती आता होईलच. स्वामी विवेकानंदांनी अनेक दशकांपूर्वी त्यांच्या युरोप दौºयातील आठवणींमध्ये म्हटले आहे की, तुम्ही स्वत:ला समाजात मिसळून टाका आणि अदृश्य व्हा आणि तुमच्या जागी नवभारत उदयाला येऊ द्या. हा भारत शेतकºयांच्या झोपड्यांतून, नांगरांतून, झोपड्यांतून उदयाला येऊ द्या. किराणा मालाचे विक्रेते, किरकोळ खाद्यविक्रेते यांच्यातून तो बहरू द्या. कारखाने, दुकाने आणि बाजारांतून तो तयार होऊ द्या. शेत आणि जंगलातून, डोंगर आणि पर्वतांतून तो उत्पन्न होऊ द्या.’
मोदीकेअर! आयुष्यमान भारत । जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 6:01 AM