"मोदीजी, हेच भाजपचे संस्कार आहेत का?", राहुल गांधींवरील टीकावर केसीआर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 03:22 PM2022-02-13T15:22:08+5:302022-02-13T15:26:25+5:30
'राहुल गांधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात, पण आम्ही त्यांना कधीही राजीव गांधी यांचा मुलगा असल्याचा पुरावा मागितला नाही.'
नलगोंडा(तेलंगणा): तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांनी असामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'राहुल गांधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात, पण आम्ही त्यांना कधीही राजीव गांधी यांचा मुलगा असल्याचा पुरावा मागितला नाही,' असे वक्तव्य हिमंत बिस्वा सरमा यांनी केले होते.
याच वाक्याचा संदर्भ देत के चंद्रशेखर राव यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका केली. 'मोदीजी ही भाजपची संस्कृती आहे. ही आपल्या देशाची मर्यादा आहे का? शरमेने माझी मान झुकली आहे. तुमचे नेते एखाद्या मोठ्या नेत्याबद्दल खालच्या पातळीची टीका करतात, त्यांना पुरावे मागतात. देशासाठी ही चांगलील बाब नाही.
वेद, भगवत गीता, रामायण, महाभारतातून हीच शिकवण मिळाली आहे का ? हिंदू धर्माला विकून मतदान मागणाऱ्यांनो, तुम्ही खूप खराब लोक आहात. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना असामच्या मुख्यमंत्र्यांना राहुल गांधींवरील वक्तव्यामुळे पदावरून हटवण्याची मागणी करतो, अशी टीका केसीआर यांनी केली.
हिमंत विस्वा सरमा यांचे वक्तव्य
2016 साली झालेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेकांनी त्या स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत. त्यावरुनच हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर टीका केली. उत्तराखंडमधील एका निवडणूक रॅलीत बोलताना ते म्हणाले की, 'बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखालील सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा राहुल गांधींना हवा आहे. पण, आम्ही तुम्हाला राजीव गांधींचे पुत्र असल्याचा पुरावा मागितला का? लष्कराकडून पुरावे मागण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुमचा बिपिन रावत किंवा सैनिकांवर विश्वास नाही का? पाकिस्तानात घुसून हल्ला केल्याचे आमच्या सैनिकांनी सांगितले असेल तर ते अंतिम आहे, असे ते म्हणाले होते.