‘मोदीजी घाई करा, डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा हवीये गळाभेट, पाकिस्तान संदर्भातील ट्विटवरून राहुल गांधींचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 08:37 AM2017-10-16T08:37:02+5:302017-10-16T08:38:16+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. प्रत्येक कार्यक्रमात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसंदर्भात केलेल्या एका ट्विटनंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका केली आहे. ‘घाई करा करा मोदीजी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा तुमची गळाभेट हवीये’ असा खोचक टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी या ट्विट करून लगावला आहे.
Modi ji quick; looks like President Trump needs another hug pic.twitter.com/B4001yw5rg
— Office of RG (@OfficeOfRG) October 15, 2017
दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानचा अमेरिकेकडून कायम निषेध होतो आहे.पण रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘पाकिस्तान आणि तिथल्या नेत्यांसोबत चांगल्या संबंधांना आम्ही सुरूवात केली आहे. अनेक आघाड्यांवर ते सहकार्य करत आहेत यासाठी त्यांचे आभार’ असं ट्विट केलं. त्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपहासात्मक टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली तेव्हा ‘भारत आमचा चांगला मित्र आहे’, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. तसंच पाकिस्तानच्या दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणावर अमेरिकेने टीकाही केली. पाकिस्तान येथील सुरक्षा दलाने हक्कानी नेटवर्कच्या तावडीतून एका अमेरिकन कुटुंबाची सुटका केली त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले. या ट्विटचा आधार घेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा विदेशातील राष्ट्राध्यक्षांची भेट घेतात तेव्हा ते त्यांची गळाभेट घेऊन भेट घेतात. त्यावरूनच राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे.
पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांसाठी त्यांचं घरच आहे अशा आशयाचं ट्विट याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. तर भारत हा आपला सच्चा मित्र असून पाकिस्तानने या देशातील दहशतवादी कारवायांना लगाम घालावा आणि काश्मीर प्रश्न चर्चेने सोडवावा असेही सल्ले अमेरिकेतर्फे देण्यात आले होते. पण आता पाकिस्तानने अमेरिकन कुटुंबाला सोडवल्यावर ट्रम्प यांनी चांगले संबंध प्रस्थापित करण्याबाबत ट्विट करताच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
याआधीही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली आहे. नुकतंच गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे-मोठे दावे करत असल्याचा मुद्दा उपस्थित करून जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी 2030पर्यंत गरिबांसाठी चंद्राला थेट जमिनीवर आणतील, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.