नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप हे झडतच असतात. अनेकदा राहुल गांधी भाजपा आणि मोदींवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळतात. राहुल गांधी यांनी इंग्रजी डिक्शनरीमध्ये Modilie (मोदी लाय) नावाचा नवा शब्द समाविष्ट झाला असल्याचं ट्वीट केलं होतं. त्या ट्विटखाली त्यांनी Modilie या शब्दाचे काही अर्थही सांगितला होता. परंतु राहुल गांधींचा तो दावा ऑक्सफोर्ड डिक्शनरीनं फेटाळून लावला आहे. Modilie (मोदी लाय) नावाचा कुठलाच शब्द अस्तित्वात नसल्याचं स्पष्टीकरण ऑक्सफोर्ड डिक्शनरीनं दिलं आहे.सत्याची सातत्याने मोडतोड करणे, सवयीने थापा मारणे, न थकता खोटं बोलणे असा अर्थ मोदी लाय या शब्दाचा असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. या आधीही राहुल यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर टीका करताना 'Jaitlie' शब्द वापरला होता. Modilie (मोदी लाय) या शब्दावरून भाजपानंही राहुल गांधीवर निशाणा साधला होता. राहुल गांधींच्या अशा वागण्यामुळे काँग्रेस पक्षाची अधोगती होत आहे. त्यामुळे राहुल मोठा हो असा टोला भाजपाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला होता.
राहुल गांधींनी सांगितलेला 'तो' शब्द अस्तित्वातच नाही, ऑक्सफोर्ड डिक्शनरीचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 9:45 PM