विजापूर : मोदीजी, तुम्ही चार वर्षांपूर्वी ‘सब का साथ, सब का विकास’ अशी घोषणा दिली होती. तिचे काय झाले?, असा सवाल करीतच, या विकासाच्या घोषणेचा तुम्ही कर्नाटकातील जनतेला काहीच फायदा होऊ दिला नाही. कर्नाटकातील जनतेला या विकासातून जाणीवपूर्व वगळण्यात आले, अशी खरमरीत टीका संयुक्त लोकशाही आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.कर्नाटक प्रचारात आज सोनिया गांधी प्रथमच उतरल्या. पंतप्रधान मोदी हे उत्तम वक्ते आहेत. ते उत्तम अभिनेतेही आहेत. पण तुमचे वक्तृत्व व अभिनय यांमुळे लोकांची पोटे भरत नाहीत. त्यांचे पोट रोज भरेल, यासाठी मोदी यांनी काहीच केले नाही, अशी सडकून टीका करून त्या येथील जाहीर सभेत म्हणाल्या की, मोदी कर्नाटकात सिद्धरामय्या सरकार भ्रष्ट असल्याचे सांगत आहेत. पण केंद्रातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी लोकपालाची नियुक्ती करण्याचे मात्र मोदी मुद्दामच टाळत आहेत. लोकपाल कायदा २0१४ साली मंजूर झाला. त्याची अंमलबजावणी न करणे म्हणजे भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करणे आहे, असेही त्या म्हणाल्या. (वृत्तसंस्था)लोकसभेसाठी शिवसेनेशी युती कायमकर्नाटकातील प्रचारादरम्यान एका मुलाखतीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपा व शिवसेना यांची निश्चित युती होईल, असा दावा केला.काँग्रेसने विष पेरलेसोनिया गांधी यांच्या सभेआधी याच विजापूरमध्ये पंतप्रधान मोदी यांचीही जाहीर सभा झाली. त्या सभेत त्यांनी कर्नाटक निवडणुकांनंतर इथे काँग्रेस पक्ष शिल्लकच राहणार नाही, असा दावा केला. जाती व धर्माच्या आधारावर काँग्रेस देशात व समाजात दुहीचे विष पेरू पाहत असल्याचा आरोप करून ते म्हणाले की, काँग्रेसने घराणेशाहीसाठी देशाचा सत्यानाश केला आहे. राहुल गांधी यांच्या सभांमुळे सारेच उमेदवार पराभूत होतील, अशी भीती काँग्रेसजनांना वाटू लागल्यामुळेच पक्षाने त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांना येथे प्रचारात उतरवले आहे, असा टोला मोदी यांनी लगावला.तर होईन मी पंतप्रधानपुढील निवडणुकांत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या तर मी पंतप्रधान व्हायला तयार आहे, असे उद्गार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढले. पत्रकारांनी २0१९ मध्ये तुम्ही पंतप्रधान होणार का, असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, हे सारे काँग्रेसला किती जागा मिळतात, यावर अवलंबून आहे. आम्हाला सर्वाधिक जागा मिळाल्या, तर पंतप्रधान व्हायला मी तयार आहे. मात्र नरेंद्र मोदी हे पुढील पंतप्रधान असणार नाहीत, हा मला विश्वास आहे.
मोदींचा अभिनय उत्तमच; पण त्याने पोटे भरत नाहीत - सोनिया गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 6:10 AM