कॅऩडाच्या पंतप्रधानांना भारतात जास्त महत्व दिले गेले नसल्याचा जगभरातून आरोप होत आहेत. जस्टिन ट्रुडो यांना मोदींनी फारसे महत्व न देता, खलिस्तानी दहशतवादावरून वन टू वन चर्चेमध्ये चांगलेच फटकारले देखील होते. जी २० च्या काही कार्यक्रमांनाही ट्रुडो आले नव्हते. यावरून कॅनडाचा अपमान झाल्याचा कांगावा तेथील लोक करत आहेत. असे असताना विमान नादुरुस्तीमुळे दोन दिवस भारतात थांबावे लागलेल्या कॅनडाच्या पंतप्रधान, प्रतिनिधीमंडळाला मायदेशात जाण्यासाठी भारताने आपले एअर इंडिया वन देऊ केले होते, हे आता समोर येत आहे.
कॅनडाचे विमान नादुरुस्त झाले होते. रेग्युलर चेकअपवेळी विमानामध्ये बिघाड असल्याचे समजले होते. यामुळे भारताने यजमानपदाची जबाबदारी म्हणून पंतप्रधान मोदी वापरत असलेले एअर इंडिया वन त्यांना मायदेशात परतण्यासाठी देऊ केले होते. परंतू, कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी कॅनडाचे दुसरे विमान मागविण्याचा पर्याय निवडला होता, असे भारताने स्पष्ट केले आहे.
हे विमान भारताच्या वाटेवर असतानाच नादुरुस्त विमान दुरुस्त झाले. यामुळे ते युरोपकडे वळविण्यात आले. यानंतर कॅनडाचे प्रतिनिधीमंडळ मायदेशी रवाना झाले. यावेळी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर त्यांना सोडण्यासाठी विमानतळावर गेले होते. या दोन दिवसांच्या वाढलेल्या मुक्कामात कॅनडाच्या डेलिगेशनसोबत भारताने कोणताही राजनैतिक संपर्क साधला नसल्याचे सांगितले जात होते. तसेच जी २० मध्ये ट्रुडो यांनी द्विपक्षीय बैठक घेण्यास सांगितले होते, परंतू मोदी यांनी फक्त वन टू वन चर्चा करण्याची परवानगी दिली होती. या सर्व गोष्टींवर खलिस्तानी दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याच्या कॅनडाच्या भूमिकेमुळे दोन देशांतील नातेसंबंध खराब झाल्याचे दिसत होते.