नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तान येथे होणाऱ्या शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन(SCO) शिखर संमेलनासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नसल्याची माहिती परराष्ट्र विभागाकडून मिळत आहे. परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांचे विमान ओमान, इराण आणि मध्य आशियाई देशाच्या हवाई क्षेत्रातून किर्गिस्तानच्या बिश्केक येथे जाईल.
परराष्ट्र विभागाच्या माहितीनुसार बिश्केकला जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला दोन पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायावर परराष्ट्र मंत्रालयात विचार सुरु आहे. मात्र पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नसल्याचा निर्णय झालेला आहे. 13-14 जून रोजी किर्गिस्तानच्या बिश्केक येथे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन(SCO) कडून शिखर संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 13 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी बिश्केकला रवाना होतील. सुरुवातीला अशी बातमी आली होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करत बिश्केकला जातील. यासाठी पाकिस्ताननेही नरेंद्र मोदी यांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून जाण्यासाठी परवानगी दिली आहे मात्र भारताने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी भारताने पाकिस्ताच्या बालकोट भागावर एअर स्ट्राईक केला होता. तेव्हापासून पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्राच्या हद्दीतील उड्डाण बंद केली होती. जवळपास 3 महिने झाले तरी पाकिस्तानने अद्याप त्यांच्या हवाई क्षेत्रातील 2 मार्ग खुले केले आहेत. हे दोन्हीही मार्ग दक्षिण पाकिस्तानहून जातात. पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र 11 भागात विभागलं आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये दोन्ही देशांमध्ये काश्मीरसह अन्य राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्याची विनंती केली होती. मात्र भारताने अद्याप इमरान खान यांच्या पत्राला उत्तर दिलं नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करणार नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही अशी भूमिका भारताने घेतली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची एससीओच्या बैठकीत भेटही होणार नसल्याची माहिती आहे.