नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदीयोगासन करीत आहेत, असा एक अॅनिमेटेड व्हिडिओ त्यांनीच बुधवारी सकाळी ट्विटरवर झळकविला आहे. २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन असून, त्या पार्श्वभूमीवर लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
मोदी त्रिकोणासन करीत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. मोदी यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनतेने काही गोष्टी ठरविल्या पाहिजेत. शरीरस्वास्थ्य नीट राखण्यासाठी योगासनांचा खूप उपयोग होतो. त्यामुळे योगासनांना प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनविले पाहिजे. तसे करण्याची प्रेरणा इतरांनाही दिली पाहिजे.
गेल्या वर्षीही नरेंद्र मोदी यांनी स्वत: योगासने करीत असलेला व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकविला होता. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यंदा केंद्र सरकारतर्फे दिल्ली, सिमला, म्हैसूर, अहमदाबाद, रांची येथे विशेष कार्यक्रम होणार आहेत. पंतप्रधानपदावर सलग दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार करीत असलेला हा पहिलावहिला मोठा सार्वजनिक उपक्रम आहे.
२१ जूनचे आगळे महत्त्वआंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनला साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घेण्यात आला. त्यानंतर २०१५ सालापासून हा दिन पाळण्यास सुरुवात झाली. उत्तर गोलार्धात २१ जून हा वर्षभरातील सर्वांत मोठा दिवस असतो. त्यामुळे याचदिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांंच्या आमसभेत २७ सप्टेंबर २०१४ रोजी केलेल्या भाषणात सुचविले होते.योगशास्त्राचा भारतात जन्म झाला असला तरी ते शिकण्यासाठी देशोदेशीचे लोक उत्सुक असतात. जगातील अनेक देशांमध्ये आता हा दिन पाळला जातो.