ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 16 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे चिंतीत असलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा द्विपक्षीय चर्चेवरून भारत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींची दादागिरी पाकिस्तान अजिबात सहन करणार नाही, मोदींचा पाकिस्तान विरोध हा केवळ निवडणुकांपुरता मर्यादित आहे. निवडणुका आटोपल्या की त्यांचा हा विरोधसुद्धा मावळेल, अशी टीका पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अझीझ यांनी केला आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला दिलेल्या मुलाखतीत अझीझ यांनी मोदीवर टीकेची झोड उठवली, ते म्हणाले, "मोदी भारतात स्वत:ला महान राष्ट्रीय नेत्याच्या रूपात स्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी याआधीही आपला निवडणूक प्रचार पाकिस्तान विरोधाला केंद्रभागी ठेवून केला होता. मात्र पाकिस्तान अशा कारवाया सहन करणार नाही,"
यावेळी भारतात सध्या सुरू असलेल्या निवडणुकांचा संदर्भ देत अझीझ म्हणाले की, "भारतात होत असलेल्या निवडणुका संपल्या की मोदींचा सूर बदलेल. तसेच पाकिस्तानसोबत चर्चा करण्याबाबतच्या भूमिकेतही बदल होईल," चीन आणि पाकिस्तानने संयुक्त भागीदारीतून तयार केलेल्या चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर मध्ये भारतही सहभागी होऊ शकतो याचाही अझीझ यांनी यावेळी पुनरुच्चार केला, तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा ही काश्मीर प्रश्नाशिवाय करता येणार नसल्याचेही सांगितले.