ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १० - मोदी सरकारमधील सर्व मंत्र्यांना त्यांच्या संपत्तीचा तपशील व व्यावसायिक संबंधांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यावी लागणार आहे. मंत्र्यांनी कोणत्याही स्वरुपाच्या व्यवसायापासून चार हात लांबच राहावे असा फतवाच मोदींनी काढला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर करडी नजर ठेवली आहे. गृहमंत्रालयाच्या माध्यमातून मोदींनी सर्व मंत्र्यांना आचारसंहितेचे एक पत्रक पाठवले आहे. यात त्यांना संपत्तीची माहिती पंतप्रधान मोदींकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्र्यांना त्याच्याकडील शेअर्स, रोख रचक्क, दागिने याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय मंत्री किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची अशा कोणताही व्यवसायात भागीदारी नसावी ज्याचा संबंध सरकारी सेवा पुरवण्यात येतो. तसेच मंत्र्यांचे पती, पत्नी किंवा अन्य कोणत्याही सदस्याला दुस-या देशात भारत सरकारच्या मिशनमध्ये नोकरी करण्यास निर्बंध टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे मंत्री या आचारसंहितेचे मंत्री पालन करतात की नाही याकडे मोदी स्वतः जातीने लक्ष देणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळावर मोदींची पकड पुन्हा एकदा दिसून आली आहे.
यापूर्वीही मोदींनी मंत्र्यांनी खासगी स्टाफमध्ये नातेवाईकांची नेमणूक करु नये, स्टींग ऑपरेशनपासून सावधान राहावे अशा स्वरुपाच्या सूचना मंत्र्यांना केल्या होत्या.