नवी दिल्ली/ मुंबई : मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या कामाला गती दिल्याबद्दल आणि लंडनमधील डॉ. आंबेडकर यांचे घर विकत घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ कार्यक्रमात महाराष्ट्र सरकारला धन्यवाद दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच टिष्ट्वट करून मोदींचे आभार मानले.मोदी म्हणाले, की मुंबईत इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न दीर्घकाळापासून अधांतरी होता. नव्या सरकारने हे काम हाती घेतले आहे. त्या ठिकाणी भव्यदिव्य आणि प्रेरक असे स्मारक उभारले जाईल. हे स्मारक दलित, पीडित, शोषित, वंचितांसाठी कार्य करण्याची प्रेरणा देत राहील, असे ते म्हणाले. लंडनमधील १० किंग हेन्री रोडवर डॉ. आंबेडकर वास्तव्याला असलेले घरही महाराष्ट्र सरकारने विकत घेतले असून, तेथेही स्मारक उभारले जाणार आहे. जगभरात भ्रमंती करणारे भारतीय लंडनमध्ये जातील, त्यावेळी हे स्मारक त्यांना प्रेरणा देत राहील. या दोन्ही प्रयत्नांबद्दल महाराष्ट्र सरकारचे मी अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
मोदींचे कौतुक व मुख्यमंत्र्यांचे ‘थँक यू !’
By admin | Published: August 31, 2015 1:26 AM