ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 17 - आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील दौ-याला सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम पंतप्रधानांनी सोमवारी सकाळी सूरतमध्ये मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उदघाटन झाले. पाटीदारांचे वर्चस्व असलेल्या ट्रस्टने हे हॉस्पिटल बांधले आहे. सध्या हा समाज भाजपावर नाराज असून, नोकरी, शिक्षणामध्ये आरक्षणाची मागणी करत आहे.
हिंदीमध्ये बोलायचे की, गुजरातीमध्ये याबद्दल माझी द्विधामनस्थिती होती. पण तुम्ही इतके मोठे कार्य केले आहे की, ते संपूर्ण देशाला कळले पाहिजे त्यामुळे मी हिंदीमध्ये बोलतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी रुग्णालयाच्या उदघाटना प्रसंगी म्हणाले. दक्षिण गुजरातमध्ये डायमंड पॉलिशिंग युनिट तसेच अन्य प्रकल्पांचे उदघाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नऊ महिन्यातील हा आठवा गुजरात दौरा आहे. नोव्हेंबरमध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गुजरातमध्ये भाजपा सलग पाचव्यांदा सत्तेसाठी प्रयत्न करणार आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंडमध्ये मिळालेली विजयाची लय कायम राखणे हा सुद्धा या दौ-यामागे उद्देश आहे. हिरे व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या सूरतमध्ये काल पंतप्रधानांनी जोरदार रोड शो केला. जवळपास 10 हजार बाईक्स या रोड शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. भाजपाने या रोड शो मधून शक्तीप्रदर्शन केले.