मोदींच्या वाढदिवशी युवकांकडून 'बेरोजगार' दिवस, कटोरा घेऊन मागितली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 03:34 PM2020-09-17T15:34:23+5:302020-09-17T16:53:01+5:30
मेरठमधील सपाच्या कार्यकर्त्यांनी हातात कटोरा घेऊन आंदोलन केलं. या कार्यकर्त्यांनी कटोरा घेऊन मोदींकडे, मोदी सरकारकडे नोकरीची मागणी केली आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी (17 सप्टेंबर) आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाकडूनही वाढदिवसाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आजचा दिवस बेरोजगारी दिवस म्हणून पाळला आहे.
उत्तर प्रदेशमधील विरोक्षी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिनी बेरोजगार दिवस पाळला आहे. मेरठमधील सपाच्या कार्यकर्त्यांनी हातात कटोरा घेऊन आंदोलन केलं. या कार्यकर्त्यांनी कटोरा घेऊन मोदींकडे, मोदी सरकारकडे नोकरीची मागणी केली आहे. गुरुवारी मेरठच्या आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर समाजवादी युवजन सभेच्या कार्यकर्त्यांनी हातात कटोरा घेऊन आंदोलन केले. देशातील युवक बेरोजगार आहे, तरुणांच्या हाताला काम नाही. देशातील युवा नोकरी मागत आहे, पण सरकारने या तरुणांच्या हातात कटोरा दिलाय, अशी घोषणाबाजी युवकांनी केल्याचे दिसून आले.
काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विट करुन, देशातील युवक आज राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करत असल्याचे म्हटले. रोजगार हा सन्मान आहे, सरकार कधीपर्यंत हा सन्मान देण्यापासून मागे राहणार आहे? असा प्रश्नही राहुल गांधींनी ट्विटरवरुन विचारला आहे.
मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. यासोबतच अभिनेत्री कंगना राणौत, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि भाजपाच्या सर्व मंडळींनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर देखील HappyBirthdayPMModi , happybirthdaymodiji, HappyBirthdayNarendraModi, HappyBdayNaMo, NarendraModi, NarendraModiBirthday हे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये असून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.
राहुल गांधींकडूनही शुभेच्छा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोरोना, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. ट्विटरवरून सातत्याने हल्लाबोल करत आहेत. मात्र आज राहुल गांधी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री कंगना राणौतने देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
फडणवीसांनी शेअर केला खास व्हिडिओ
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'सेवाव्रतीचा वाढदिवस सेवाकार्यानेच साजरा करा!' असं म्हणत खास व्हिडीओ शेअर केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपाचे जे.पी. नड्डा, गीता फोगाट यांच्यासह अनेक मान्यवरांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.