- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
सरत्या वर्षाला निरोप देताना ३१ डिसेंबरच्या सायंकाळी ७.३0 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा राष्ट्राला उद्देशून भाषण करणार असून, नव्या वर्षात ‘कॅशलेस इंडिया’ची मोहीम राबविण्याची घोषणा ते करतील, अशी दाट शक्यता आहे. नोटाबंदीच्या यशात सामान्य जनतेची साथ मिळाल्यामुळे केंद्र सरकार व भाजपने इमानदारी आणि प्रामाणिकपणाचे नवे प्रतीक ‘कॅशलेस भारत’ मोहीम राबवण्याचे ठरविले आहे. जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या हेतूने भाजपतर्फे नव्या वर्षात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ५0 दिवसात अनेक हालअपेष्टा सोसूनही देशातल्या जनतेने अपूर्व संयम दाखवला, त्याबद्दल पंतप्रधान सर्वप्रथम आपल्या भाषणात कृतज्ञता व्यक्त करतील. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरेही कदाचित मोदी यावेळी देतील. शिवाय, केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी सरकारच्या कठोर निर्णयांचे विवेचनही भाषणात असेल, असे कळते. या प्रश्नांची उत्तरे मिळणार?- नोटाबंदीनंतर नियमांमध्ये रिझर्व बँक व सरकारला इतके बदल का करावे लागले?- ८ नोव्हेंबरला भारतीय चलनात नेमक्या किती नोटा होत्या?- गेल्या ५0 दिवसांत ५00 आणि १000 रुपयांच्या नेमक्या किती नोटा बँकांत जमा झाल्या?- नोटबंदीचा सरकारला खरोखर फायदा झाला की नाही?- प्राप्तिकर विभाग व अन्य यंत्रणांनी घातलेल्या धाडींत किती नोटा पकडल्या गेल्या?- याचा सविस्तर खुलासा करताना विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरेही बहुदा पंतप्रधान देतील. ५00 च्या नव्या नोटा लवकरच : जेटलीअर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, नोटाबंदीचे लोकांनी स्वागत केल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडवणारी अथवा अराजकता निर्माण करणारी एकही घटना ५0 दिवसांत कुठेही घडली नाही. देशाच्या महसुली उत्पन्नात कररूपाने मोठी भर पडली आहे, हा नोटबंदीचा महत्त्वाचा लाभ आहे. रद्द झालेल्या चलनी नोटांचा मोठा भाग बदलला गेला आहे आणि रिझर्व बँकेजवळ नव्या नोटा आवश्यक प्रमाणात उपलब्ध आहेत. ५00 रुपयांच्या नव्या नोटाही लवकरच येणार आहेत.