कोलकाता : वर्षातून दोनदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कुर्ते पाठवत असल्याच्या खुलाशानंतर मोदी यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलचे तब्बल 40 आमदार माझ्या संपर्कात असल्याचे सांगत 23 मे रोजी ते तुम्हाला सोडून जातील, असा इशारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ममता बॅनर्जी आपल्याला वर्षातून दोनदा कुर्ते आणि मिठाई पाठवत असल्याचे सांगत मोदी यांनी ममता यांचा विरोध दाखवण्यापुरताच असल्याचे सूतोवाच केले होते. तर ममता यांनी यावर प्रत्यूत्तर देताना मातीपासून मिठाई तयार करु आणि त्यामध्ये दगडांचा वापर करु. ही मिठाई नरेंद्र मोदींना पाठवू, यामुळे मिठाई खाताना त्यांचे दात तुटतील, असा टोला लगावला होता.
तसेच आज मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ आणि भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना केलेली मारहाण यावरूनही तेथील प्रचारसभेमध्ये टीका केली. मोदी यांची संपोरमध्ये सभा झालीय यावेळी त्यांनी तृणमूलवर भाजपसाठी मतदान करणाऱ्या मतदात्यांना रोखण्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच भाजपाला प्रचार करू देत नसल्याचाही आरोप केला आहे.
बालुरघाट आणि गंगारामपूर इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी 'नरेंद्र मोदी याआधी पश्चिम बंगालमध्ये कधी आले नाहीत, आणि आता त्यांना बंगालमधून मतं हवी आहेत. आम्ही त्यांना बंगालमधील रसगुल्ला देऊ. आम्ही मातीपासून मिठाई तयार करु आणि त्यात दगडांचा वापर करु. ज्याप्रमाणे लाडू तयार करताना त्यात काजू, बेदाणे वापरतात त्याऐवजी दगडांचा वापर करु. यामुळे त्यांचे दात तुटतील’, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला 2014 मध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना मोठा रसगुल्ला म्हणजे भोपळा मिळेल अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली.