नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी आगामी वर्षात विदेश दौरा करण्यात नसल्याचे समजते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. कारण, 2019 च्या पहिल्या चार महिन्यात मुद्दे आणि निवडणुकांची रणनिती याबाबत मोदी अभ्यास करणार आहेत. एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
पंतप्रधाननरेंद्र मोदींचे विदेश दौरे आणि त्यावर होणारा खर्च हा देशात चर्चेचा विषय ठरला होता. तर, पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी एकही देश फिरायचा सोडला नाही, असे मेम्स सोशल मीडियावर व्हायरल होते होते. त्यामुळे मोदींच्या विदेश दौऱ्यावरुन त्यांची खिल्लीही उडवली जात. मात्र, आगामी 2019 च्या कालावधीत मोदींकडून कुठल्याही विदेश दौऱ्याचे आयोजन करण्यात आले नाही. केंद्रातील मोदी सरकारचा सर्वात मोठा चेहरा नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांची मोठी जबाबदारी मोदींवरच आहे. त्यातच, 11 डिसेंबर रोजी लागलेल्या 5 राज्यांच्या निकालात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे मिशन 2019 लक्षात घेता मोदींनी आपला पूर्ण वेळ देशातील मुद्दे आणि निवडणुकांवर फोकस करण्यासाठी देणार आहेत. मात्र, 21 ते 23 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमा मोदी सहभागी होतील. मोदींच्या वाराणसी मतदारसंघात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रमही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच घेण्यात येईल, असेही दिसून येत आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी मोदींनी 14 विदेश दौरे केले होते. पीएमओच्या अधिकृत साईटनुसार 2014 ते 2018 पर्यंत मोदींनी तब्बल 48 विदेश दौरे केले आहेत. मात्र, आता स्थानिक मुद्दयांचा अभ्यास करण्यासाठी मोदी विदेश दौऱ्यांपासून दूर राहतील, अशी माहिती आहे.