हरीश गुप्ता, नवी दिल्लीनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांच्या पहिल्या स्नेहमिलन कार्यक्रमाला नेताजींची जर्मनीत राहणारी कन्या उपस्थित राहावी, यासाठी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. येत्या आॅक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी हा ‘महत्त्वपूर्ण कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला नेताजींची कन्या अनिता बोस प्फाफ आणि त्यांची तिन्ही मुले, एवढेच नव्हे तर त्यांच्या पतीनेही उपस्थित राहावे, अशी मोदींची इच्छा आहे.पीएमओ कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेताजींची एकुलती एक कन्या अनिता बोस आपल्या तिन्ही मुलांसह या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, हे सुनिश्चित करण्यासाठी मोदींनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न चालविले आहेत. मोदींनी गेल्या एप्रिलमधील आपल्या जर्मनी दौऱ्याच्या वेळी अनिता बोस आणि त्यांच्या कुटुंबियांना बर्लिनला येण्यासाठी व्यक्तिगतरीत्या निमंत्रण पाठविलेले होते; परंतु बावेरिया ते बर्लिनपर्यंत लांबचा प्रवास करणे अतिशय कठीण जाईल, असे सांगून अनिता यांनी बर्लिनला भेट देण्यास असमर्थता दर्शविली होती. अनिता या बावेरिया येथे पती प्रा. मार्टिन प्फाफ यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. अनिता आणि मार्टिन यांना पीटर अरुण, थॉमस कृष्णा व माया कॅरिना अशी तीन अपत्ये आहेत. मुलांची भारतीय नावे ठेवून त्या भारताच्या संपर्कात असल्याबद्दल मोदींनी सुखद आश्चर्य व्यक्त केले होते. अनिता या नेताजींच्या एकमेव कन्या आहेत. त्यांचा जन्म व्हिएन्नात झाला होता. आॅक्टोबरमध्ये आयोजित केलेल्या या कौटुंबिक मेळाव्याच्या निमित्ताने नेताजींच्या वारशावरून आपला फायदा करून घेण्याचा व या मुद्यावरून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. नेताजींच्या कुटुंबातील किमान ५० च्या वर सदस्य आपल्या निवासस्थानी एकत्र येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी रविवारी जाहीर केले आहे, हे विशेष.
नेताजींच्या फाईल्सवरून काँग्रेसची कोंडी करण्याचा मोदींचा निर्धार
By admin | Published: September 20, 2015 10:50 PM