किनौर (हिमाचल प्रदेश): काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानशी प्रत्यही दररोज खडाजंगी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशच्या किनौर आणि लाहोल स्पिती जिल्ह्यांच्या वेशीवर चीनच्या सीमेलगत चँगो येथील लष्कराच्या तळावर जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ‘तुम्ही अहोरात्र जागे राहून सीमेवर पहारा देता, म्हणून (आम्ही) देशवासीय निर्धास्तपणे झोपू शकतो,’ अशा शब्दांत शाबासकीची थाप देऊन मोदींनी जवानांचे मनोबल उंचावले.सत्तेवर आल्यानंतर सन २०१४ मध्ये मोदींनी पहिली दिवाळी सियाचेन येथे जवानांसोबत साजरी केली होती. गेल्या वर्षीच्या दिवाळीत त्यांनी पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील लष्करी छावणीस भेट दिली होती. चँगो लष्करी तळावर पंतप्रधानांच्या सोबत लष्करप्रमुख जनरल दिलबाग सिंग व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हेही होते.पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर उतरताच जवानांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले आणि दुर्गम, बर्फाळ भागातील वातावरणही राष्ट्रभक्तीने भारावून गेले. चँगो हा भारतीय लष्कराचा बेस कॅम्प असला, तरी तेथून लष्कराखेरीज भारत-तिबेट सीमा पोलीस आणि डोगरा स्काउट््सचे जवान चीन सीमेवर येथून पहारा ठेवतात. (वृत्तसंस्था)>‘ओआरओपी’चे वचन पाळलेजवानांसमोर बोलताना मोदी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी ‘वन रँक, वन पेन्शन’ (ओआरओपी) संदर्भात लिहिलेल्या पत्राला अप्रत्यक्ष उत्तरही दिले. आपण दिलेले वचन पूर्ण केले, असे सांगून मोदी म्हणाले की, पंतप्रधान झाल्यावर आपण सर्वप्रथम हा निर्णय घेतला व संपूर्ण सरकारची त्यावरून झोप उडाली. आधीच्या सरकारमधील लोकांना हा विषय नीटसा कळला नसावा, म्हणून त्यांनी यासाठी ५०० कोटींची तरतूद केली होती. आम्ही निर्णय घेतला व पहिला हप्ता म्हणून ५,५०० कोटी रुपये दिले. सर्व पैसे चार हप्त्यांत चुकते केले जातील.>गावकऱ्यांशी मनमोकळ््या गप्पाजवानांसोबत दिवाळी साजरी केल्यावर मोदी किनौर जिल्ह्यातील सुमदो गावी गेले. पूर्वनियोजित नसेलेल्या या कार्यक्रमबाबत एवढी गुप्तता पाळली की, मोदी तेथे पोहोेचेपर्यंत राज्याच्या मुख्य सचिवांनाही या भेटीची कल्पना नव्हती. सुमदो हे अत्यंत विरळ वस्ती असलेल्या किनौर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. येथील २५ गावकऱ्यांना मोदी भेटले.
मोदींची चीन सीमेवर जवानांसोबत दिवाळी
By admin | Published: October 31, 2016 5:53 AM