मथुरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाजाच्या सर्वच घटकांना दूर सारून आपल्या पतनाची पटकथा लिहीत आहेत. आता या देशातील शेतकरी त्यांच्यावर टीका करीत नाहीत तर अतिशय वाईट शब्दात त्यांचा समाचार घेत आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी आश्वासने न पाळल्याबद्दल पंतप्रधानांवर हल्लाबोल केला.मथुरेत काँग्रेसच्या चिंतन बैठकीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी, ‘अॅप्पल’ कंपनीत नवा प्राण फुंकणारे स्टीव जॉब्स यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, जेव्हा रालोआचे पतन घडून येईल आणि स्वत:लाच सर्वाधिक नुकसान पोहोचविणारे नरेंद्र मोदी ‘बाहेर’ पडतील तेव्हा निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका चमूप्रमाणे एकजूट होऊन काम केले पाहिजे. अच्छे दिन येतील, असे आश्वासन मोदींनी शेतकऱ्यांना दिले होते. आता शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मी देशात जेथे जेथे जातो तेथे तेथे शेतकरी मोदींना शिव्या देतात. शेतकरी मोदींवर टीका करीत नाहीत तर अपशब्द वापरतात. युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत. तीनवेळा आश्वासने देऊनही अद्याप एक पद, एक पेन्शन मिळालेले नाही.मोदींनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. काँग्रेसने त्यांचे जेवढे नुकसान केले आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान ते स्वत:ला पोहोचवित आहेत. आम्ही आपले स्थान पक्के केले पाहिजे. मोदींचे पतन निश्चित आहे. ते बाहेर जातील तेव्हा जी जागा रिक्त होईल ती आम्हाला भरायची आहे. तुम्ही मोदींवरील हल्ले सुरूच ठेवा, असे आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केले. आकाश काळे आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले, तर संघ आणि भाजपचे सर्वजण आकाश काळे आहे, असेच म्हणतील. चिंतन बैठक जर संघाची असती आणि आकाश काळे आहे, असे भागवत म्हणाले असते, तर कुणीही त्याचा विरोध करून सत्य मांडण्याची हिंमत दाखविली नसती. आकाश काळेच आहे, असे सर्वांनी मान्य केले असते. काँग्रेसमध्ये मात्र असे नाही. संघ आणि काँग्रेसच्या विचारसरणी हाच मूलभूत फरक आहे. संघ ही विचारसरणी नसून ती हुकूमशाही प्रवृत्ती आहे. काँग्रेसची विचारसरणी हे विविधतेत एकतेची आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले.(वृत्तसंस्था)
मोदींचे पतन अटळ
By admin | Published: September 21, 2015 11:43 PM