ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - चैत्र नवरात्रीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ दिवसांचा उपवास चालू आहे. यावेळी ते फक्त गरम पाणी, दूध आणि ज्यूस घेणार आहेत. इतका कडक उपवास असतानाही मोदींचं वेळात्रकही तितकंच व्यस्त असणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मोदी पायभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि अध्यात्माशी संबंधित कार्यक्रमांमध्ये व्यस्त असणार आहेत. येत्या रविवारी नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठ्या रस्ता बोगद्याचं लोकार्पण करणार आहेत. जम्मूला श्रीनगरशी जोडणा-या चेनानी - नाशरी बोगद्यामुळे दोन्ही शहरांमधील अंतर कमी होणार आहे.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद हाऊसमध्ये मलेशियाचे पंतप्रधान नजीब रज्जाक यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारोप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर चेनानी - नाशरी बोगद्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या बोगद्याचं उद्घाटन झाल्यानंतर नरेंद्र मोदी उधमपूरमधील एका प्रचारसभेत सहभागी होणार आहेत.
चैत्र नवरात्रीला पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष महत्व देतात. याशिवाय शारदीय नवरात्रातही मोदी नऊ दिवस उपवास ठेवतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही नवरात्रींमध्ये उपवास ठेवतात. उपवासात ते फक्त पाणी, दूध आणि ज्यूस घेतात. मात्र याचा त्यांच्या कामावर काहीही परिणाम होत नाही. नेहमीच्या ऊर्जेने स्वत:ला झोकून देत ते काम करत असतात".
इतकंच नाही तर या व्यस्त वेळापत्रक आणि उपवासातून वेळ काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मार्ट इंडिया हॅकथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम शनिवारी सकाळी 8 ते रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. नरेंद्र मोदी शनिवारी रात्री 10 वाजता सहभागी झालेल्यांना संबोधित करतील. पंतप्रधान मोदी किमान 45 मिनिटे भाषण करतील अशी माहिती आहे.